अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
आकाशातून लक्ष्याच्या दिशेने झेपावणारे ड्रोन व लक्ष्यापासून काही अंतरावर आल्यावर त्यांच्याकडून होणार्या स्फोटकांच्या मार्याने उद्ध्वस्त होणारे लक्ष्य….अजस्त्र अशा भीष्म-अर्जुन व अजय या रणगाड्यांतून ज्वाळांचा लोळ पसरवत झेपावणार्या बॉम्बने पाच किलोमीटर अंतरावरील लक्ष्याच्या उडणार्या चिंधड्या….असा युध्द थरार लष्करी जवान, त्यांचे कुटुंबीय, देश व परदेशातून आलेल्या वरिष्ठ लष्करी अधिकार्यांनी सोमवारी (20 जानेवारी) सकाळी केके रेंज युध्द सराव क्षेत्रावर अनुभवला. अचूक लक्ष्यभेदावर होणारा टाळ्यांचा कडकडाट वातावरणात उत्साह पसरवून गेला. यानिमित्ताने शस्त्रसज्ज व समृध्द भारतीय लष्कराच्या ताकदीला दाद दिली गेली तसेच आधुनिक युध्द साधने व शस्त्रांचे दर्शन व माहितीही उपस्थितांनी घेतली.
अहिल्यानगरपासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर विळद घाटाच्या परिसरात केके रेंज युध्द सराव क्षेत्र आहे. तेथे सोमवारी सकाळी वार्षिक युध्द सराव प्रात्यक्षिके झाली. येथील एसी सेंटर अँड स्कूल या लष्करी प्रशिक्षण केंद्राचे कमांडंड मेजर जनरल विक्रम वर्मा यांच्यासह नेपाळचे ब्रिगेडियर मनोज थापा यांच्यासह अमेरिका, बोस्निया, सौदी, नेपाळ या मित्र राष्ट्रांतील वरिष्ठ लष्करी अधिकारी यावेळी उपस्थित होते. मॅकेनाईज्ड इन्फ्रंट्रीने आपली सक्षमता प्रात्यक्षिकांतून दाखवली आहे व या प्रात्यक्षिकांत जवानांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करीत अचूक लक्ष्यभेद केल्याचे समाधान असल्याची भावना यावेळी कमांडंड मेजर जनरल वर्मा यांनी व्यक्त केली.
सोमवारी भल्या पहाटे केके रेंज युध्द सराव क्षेत्रावर दाखल झालेल्या उपस्थितांचे स्वागत एका दणदणीत स्फोटाने झाले. रणगाड्यातून डागला गेलेला तोफगोळा अचूक लक्ष्यभेद करीत असल्याचे उपस्थितांनी पाहिले व त्यांच्या डोळ्यांचे पारणेच फिटले. टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला. आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक प्रात्यक्षिके रंगू लागली. अर्जून व भीष्म (टी 90), अजय (टी 72) या रणगाड्यांतील प्रशिक्षित लष्करी जवानांनी 800 मीटर, दीड हजार मीटर, दोन हजार मीटर, तीन हजार मीटर व पाच हजार मीटरवरील लक्ष्यभेद केला. इनफ्रंट्री कॉम्बॅक्ट व्हेईकल (बीएमपी 1 व बीएमपी 2) सारस व बस्ट यांनीही प्रात्यक्षिके दाखवली. या दरम्यान उपस्थिताना प्रसिध्द सुखोई विमानाचे दर्शन झाले. चिता हेलिकॉप्टरही प्रात्यक्षिकात सहभागी झाले होते. रेकी वॉरियर टँकव्दारे शत्रूच्या क्षेत्राची टेहळणी व शत्रूस्थानाचा नाश करण्याचे वैशिष्ट्य दाखवले. प्रत्यक्ष युध्द प्रात्यक्षिकातून शत्रू स्थानांना घेरणे व ते स्थान नष्ट करण्याचे ध्येय साध्य करण्याचे कौशल्य दाखवले गेले.