रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh
शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ (Shirdi International Airport) काकडी शिवारात घडलेल्या हत्याकांडात (Murder) साहेबराव पोपट भोसले, कृष्णा साहेबराव भोसले यांना जिवे मारण्यात आले होते. तर साखरबाई साहेबराव भोसले यांना गंभीर मारहाण करण्यात आली होती. उपचार चालू असताना साखरबाई (वय 55) यांचा रविवारी पहाटे पाच वाजता मृत्यू (Death) झाला आहे. सलग आठ दिवस साखरबाई यांची मृत्युशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली आहे. या कुटुंबातील तिघांचाही मृत्यू झाल्याने संपुर्ण कुटुंब संपले आहे.
जनावरांना मक्याचा मुरघास बनविण्याच्या कामासाठी आलेल्या दोन तरुणांनी ज्या ठिकाणी काम केले त्याच ठिकाणच्या घरातील दोघांना ठार मारून पळाल्याची घटना शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ (Shirdi International Airport) काकडी शिवारात घडली होती. चोरलेल्या मोबाईलमुळे (Mobile) बारा तासाच्या आत आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले. या आरोपींनी चोरी (Theft) करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. भोसले यांच्या घरातून चोरलेले सोन्याचे दागिने (Gold Ornaments) पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त (Seized) केले आहे. संदिप दहाबाड व जगन काशिनाथ किरकिरे या दोन तरुणांना काकडी शिवारात मकाची कुट्टी करून जनावरांचा चारा मुरघास बनविण्याचे कामासाठी भोसले यांचे नातेवाईकांनी या दोघा तरुणांना काकडी शिवारात आणले होते. बरेच दिवस ते दोघे या ठिकाणी काम करता करता अनेक शेतकर्यांकडे कामानिमित त्यांचे जाणे येणे सुरू होते.
साहेबराव भोसले यांचा दुग्ध व्यवसाय असल्याने त्यांचा मुरघास या तरुणांनी बनवून दिला. त्यामुळे ओळख वाढल्याने भोसले यांचे घरी त्यांचे जाणे येणे सुरू होते . ज्यावेळी साहेबराव किवा कृष्णा घरात नसेल त्यावेळी ते दोघे पाणी पिण्याचे निमित्ताने घराची सर्व झाडा झडती घेत असत. घरात काय कुठे आहे, चोरी केल्यास किती माल मिळेल याची सर्व माहिती त्यांनी घेतली. परंतु ही गेम कधी वाजवायची हा गोंधळ त्यांचे मनात सुरु होता. जाताना मोठा माल घेवून जावू असे ते दोघे स्वप्न रंगवत असताना काकडी शिवारातले मुरघासाचे काम संपले म्हणून घरी परतायचे असल्याने अखेर त्यांनी 5 एप्रिलची रात्र निवडली. रात्री पासूनच भोसले यांच्या घराचे आसपास दबा धरून बसलेल्या या दोघांनी पहाटेच्या वेळी भोसले यांचा दरवाजा ठोठावला. ओळखीच्या कामगारांचा आवाज आहे म्हणून दरवाजा उघडला असता दोघांनी आपल्या जवळील टणक हत्यार व पावड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. गंभीर दुखापत झाल्याने कृष्णा व साहेबराव निपचित रक्ताच्या थारोळ्यात पडले. पत्नी साखरबाई यांनीही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला त्यांनाही जबर मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. या घटनेनंतर हे दोघे दरोडेखोर मोटार सायकल, मोबाईल व सोने घेवून पसार झाले.
साहेबराव यांची वृद्ध आई कर्णबधीर व अंध असल्याने त्यांना घरात काय घडले याचा मागमूस ही लागला नाही. सकाळ झाली. भोसले हे नित्यनेमाने सकाळी दूध घेऊन येतात आज का आले नाही म्हणून डेअरी वाल्याने निरोप पाठविला. निरोप घेवून गेलेल्या माणसाने हे तिघेही रक्ताचे थारोळ्यात पडलेले दिसले. घटना वार्यासारखी पसरली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्रे फिरवली दरोडेखोरांनी भोसले यांचा मोबाईल चोरुन नेला. चोरी झालेला मोबाईल लोकेशनवर टाकला परंतू मोबाईल बंद असल्याने लोकेशन दाखवत नव्हता अखेर दुपारनंतर आरोपींनी आता धोका नाही अशी खात्री झाल्याने सिन्नर (Sinner) येथील पळसे टोल नाक्या नजिक मोबाईल चालू केला. पोलिसांना मोबाईल लोकेशन मिळताच सिन्नर पोलिसांच्या मदतीने अवघ्या काही तासात दोघाना जेरबंद (Arrested) करण्यात यश आले.