निफाड तालुक्यातील सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व लक्ष्मणराव माधवराव गुंजाळ (काकासाहेब) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या जाण्याने सर्वसामान्य माणसांच्या विकासासाठी अविश्रांत कष्ट घेणारे नेतृत्व हरपले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या कार्यात मौलिक योगदान देणारे मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड गेले आहेत.
कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या काकासाहेबांचा जन्म निफाड तालुक्यातील विंचूरजवळील गुंजाळवाडी येथे 6 मार्च 1935 ला झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विंचूर व लासलगाव येथे पूर्ण झाले. विद्यार्थी दशेपासून ‘संघर्षातून नवनिर्मिती’ हे ब्रीद घेवून काकासाहेबांनी आपल्या कार्याची दिशा निश्चित केली. शेतीव्यवसायातून उपजीविका भागवत असताना शेतीला जोडधंदा असावा तरच शेती नफ्यात राहू शकते, ही दूरदृष्टी ठेवून त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरु केला. विंचूर व पंचक्रोशीत शेतकरी मेळावे घेवून शेतकर्यांना दुग्ध व्यवसायासाठी प्रेरित केले. विंचूर परिसरातील तरुणांना उच्चशिक्षणासाठी सतत प्रेरणा दिली. कुटुंबातील व गावातील तरुण डॉक्टर, वकील, इंजिनियर, शेती शिक्षण, न्यायाधीश इथपर्यंत पोहोचावेत म्हणून त्यांना उच्चशिक्षणासाठी सर्वोतोपरी मदत केली.
नाशिक जिल्ह्यातील उत्तम शेतकरी म्हणून त्यांचा सर्वत्र बोलबाला होता. 1980 ते 1990 दरम्यान त्यांची द्राक्षबाग पाहण्यासाठी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील शेतकरी येत. होतकरू शेतकर्यांना ते मार्गदर्शन करीत. त्या काळी शेतीत पिकवलेली द्राक्षे स्वत: परदेशात निर्यात करीत. इतर शेतकर्यांनाही या कामी मदत करत असत. काकासाहेबाना धार्मिक क्षेत्राची आवड होती. आपल्या उत्पन्नातील काही भाग धार्मिक क्षेत्रात लावावा म्हणून ते प्रयत्नशील असत. विंचूर येथे दिंडोरीप्रणित स्वामी समर्थ केंद्र उभारण्यात त्यांचा सिहांचा वाटा होता. त्यांची अर्धांगिनी विठाबाईसुद्धा धार्मिक क्षेत्रात अग्रेसर होत्या. काकांच्या जीवनात उत्तर भारतातील महेशआनंद स्वामी (बाबाजी) आले आणि आदर्श गुरु-शिष्य कसे असावेत? याचे उदाहरण त्यांनी समाजासमोर ठेवले.
परिसरातील संत नाना महाराज, खेडलेझुंगे येथील तुकाराम बाबा, माऊली बाबा, काशिनाथ बाबा तसेच दिंडोरी येथील गुरुमाऊली यांचेही सानिध्य काकांना लाभले. विविध मंदिरे, हरिनाम सप्ताह, सार्वजनिक विवाह यामध्येही त्यांचे योगदान मोठे आहे. गावातील महाशिवरात्र यात्रेचे ते नेहमी अध्यक्ष असत. कुस्ती हा प्रकार त्यांचा आवडता खेळ होता. विंचूरमधील यात्रेनिमित्त भारतातील विविध राज्यांचे पहिलवान कुस्त्यांच्या फडात निमंत्रित केले जात. गावातील तरुणांनीसुद्धा व्यायाम, मेहनत करून आपली प्रकृती उत्तम ठेवावी, कुस्तीत गावाचे नाव मोठे करावे म्हणून ते तरुणांना प्रेरित करीत. त्यासाठी त्यांनी कर्मवीर विद्यालयालगत व्यायामशाळा सुरु केली होती.
राजकारणात त्यांनी कधीही प्रत्यक्ष भाग घेतला नाही. आपल्या सहकार्याना विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, साखर कारखाना, बाजार समिती, विकास सोसायटी अशा अनेक निवडणुकांमध्ये प्रामाणिक तरुणांना प्रोत्साहन देवून विजयी केले. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्याशी त्यांचा जवळून संपर्क आला. शेतकरी, कष्टकरी यांच्या व्यथा काकासाहेब त्यांच्या कानावर घालत. काकासाहेब हे पुरोगामी विचाराचे होते. सहकार क्षेत्रातील माजी मंत्री विनायक पाटील, माजी आमदार मालोजी मोगल, सहकार महर्षी माधवराव बोरस्ते, काकासाहेब वाघ, माजी आमदार जनार्दन पाटील, मारुतीराव पवार, कल्याणराव पाटील, चांगदेवराव होळकर, सीताराम होळकर यांच्यासोबत त्यांनी सहकार क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली.
काकांना लहानपणापासून वाचनाचा छंद होता. अनेक महात्म्यांची चरित्रे आणि अनेक नामवंत लेखकांच्या पुस्तकांचे वाचन त्यांनी केले. वाचनाबरोबर महात्म्यांची तत्वे जीवनात अंगिकारली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर 14 एप्रिल 1957 नंतर माजी आमदार अमृतराव रणखांबे यांना सोबत घेवून पहिली सार्वजनिक मिरवणूक व जयंती सोहळा काकांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळी झाला.
विंचूरमधील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीचे ते अध्यक्ष होते. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक व सामजिक कार्यावर नितांत श्रद्धा ठेवून विंचूर येथे रयत शिक्षण संस्थेचे विद्यालय असावे म्हणून धोंडू महाराज पारीख, किसनराव जेऊघाले, सखाराम पाटील दरेकर, देविदास काशीकर, भिमाजी राउत, रंगनाथ कुलकर्णी, भिवसेन चव्हाण, गोपीनाथ ढवण, पर्वतराव दरेकर, माधवराव दरेकर, रत्नाकर रणखांबे, अमृतराव रणखांबे, सदाशिव पाटील दरेकर, दत्तात्रय पुंड, गोविंदराव महाजन, बालकिसन मालपाणी यांच्या सहकार्याने सन 1959 साली त्यांनी विंचूर येथे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर विद्यालय सुरु केले. या विद्यालयाचा लाभ विंचूर परिसरातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना आज मिळत आहे.
1959 साली विद्यालय सुरु करण्यात आले तेव्हा विद्यालयाला स्वत:ची इमारत नव्हती. विद्यालय गावातील पोतनीस वाड्यात भरत असे. पुढे विद्यार्थी संख्या वाढल्यानंतर विद्यालयास स्वतंत्र इमारतीची गरज भासू लागली. तेव्हा गावातील सहकार्यांच्या मदतीने, श्रमदानातून भव्य इमारत उभारण्यात आली. त्यात काकांचा सिहांचा वाटा होता. त्या पुढील काळात काकांना नारायणे गुरुजी, जनार्दन ठाकूर, रामदास चव्हाण, रामनारायण सोनवणे, सुनील मालपाणी, जगदीश जेउघाले, पंढरीनाथ दरेकर, कैलास सोनवणे, गंगाधर जेउघाले, काशिनाथ शेवाळे, अनिल दरेकर यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्यातून सन 1978 साली विद्यालयात विज्ञान शाखा तर 1993-94 साली कला शाखा सुरु करण्यात आली. त्यामुळे पंचक्रोशीतील बहुजनांची मुले-मुली शिकू लागली.
पुढील काळात विद्यार्थी संख्या वाढतच गेली. उपलब्ध इमारत कमी पडत असल्याने नवीन 18 खोल्यांची इमारत रयत संस्थेचे व्हा. चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काकासाहेब गुंजाळ व त्यांच्या सहकार्यांनी 2 कोटींचे काम पूर्ण केले. जानेवारी 2019 मध्ये संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते विस्तारित इमारतीचे उदघाटन करण्यात आले. आज 3,000 विद्यालयात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
विनयशीलता, अपार कष्ट करण्याची तयारी, उत्तुंग ध्येयवाद, सामाजिक कार्याचा ध्यास हे काकासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू होते. त्यांच्या जाण्याने सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थेची अपरिमित हानी झाली आहे. त्यांचे कार्य आणि विचारांतून प्रेरणा घेवून प्रयत्नशील राहणे हीच त्यांना आदरांजली ठरेल.
– रणजित गुंजाळ