Sunday, June 14, 2026
HomeनगरLeopard Attack : कळस येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; ग्रामस्थांत भीतीचे वातावरण

Leopard Attack : कळस येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; ग्रामस्थांत भीतीचे वातावरण

पारनेर । तालुका प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील कळस गावात मंगळवारी रात्री बिबट्याच्या हल्ल्यात गणेश तुळशीराम गाडगे (वय ४०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या सुतार वस्तीजवळ घडली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश गाडगे हे संध्याकाळी साडेसातच्या सुमारास कळसहून त्यांच्या घराकडे परतत होते. याचवेळी एका बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. रात्री आठ वाजेपर्यंत ते घरी न पोहोचल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. त्यावेळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने त्यांना टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

कळस आणि आसपासच्या भागात ऊस शेतीचे प्रमाण जास्त असल्यामुळे बिबट्यांचा वावर नेहमीच जाणवतो. यापूर्वी बिबट्यांनी पाळीव जनावरांवर हल्ले केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, परंतु मानवी जीवितहानीची ही पहिलीच घटना असल्याने गावकऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी शेतातून ये-जा करताना किंवा बाहेर पडताना सतत धोका जाणवत असल्याची तक्रार ग्रामस्थ करत आहेत.

या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी वनविभागाकडे त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावणे आणि रात्रीच्या वेळी गस्त वाढवणे यासारख्या खबरदारीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. वनविभागाने या घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. परिसरात बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच, त्यांनी ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहनही केले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : महायुतीची ‘सेफ हाऊस’ पॉलिटिक्स; शिवसेनेनंतर भाजपचेही...

0
नाशिक | Nashik स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर महायुतीने (Mahayuti) आपल्या नगरसेवकांना एकत्र ठेवण्याची रणनीती आखली आहे. शिवसेनेचे (शिंदे...