ना. छगन भुजबळ यांनी दिले आश्वासन
भंडारदरा (वार्ताहर) – सर्वोच्च उंच असलेल्या कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी रोप वेच्या सुविधेला मंजुरी द्यावी अशी मागणी घोटीच्या मित्र मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली. त्यावर यासाठी संबंधित विभागाकडून समीक्षा केली जाईल व त्यानंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
कळसूबाई हा अकोला तालुक्यातील, अहमदनगर जिल्ह्यातील महाराष्ट्राचा सर्वोच्च शिखर असलेला पर्वत आहे. शिखरावर कळसूबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. त्यामुळे गिर्यारोहकांना कळसूबाईची चढाई नेहमीच साद घालत असते. वर्षांचे बाराही महिने गिर्यारोहकांचा येथे राबता असतो. शिखरावर कळसूबाई देवीचे छोटेसे मंदिर आहे. परिसरातील आदिवासी समाजासह अनेकांची कुलदेवता आहेत. नवरात्राचा उत्सव शिखरावरील मंदिरात मोठ़्या उत्साहात साजरा केला जातो.
नऊ दिवस येथील भाविकांची मोठ़्या प्रमाणात गर्दी उसळते. या शिखरावर जाण्यााठी बारी गावाच्या दिशेने जावे लागते. भाविकांना, पर्यटकांना लोखंडी शिड्यांचा आधार घेत जावे लागते. त्यात पाच ते सहा तास लागतात. त्यामुळे मोठी कसरत करावी लागते. शिवाय वेळेचा अपव्ययही होतो. मानसिक त्रासाला अनेकांना सामोरे जावे लागते. रोप वेची सुविधा झाल्यास या त्रासातून मुक्तता मिळेल. तसेच पर्यटकांची संख्या वाढू शकेल.
अकोले तालुक्यात आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने पर्यटन विकासाचा कार्यक्रम राबवला जात आहे. त्याअंतर्गत कळसूबाई शिखराचे विद्युतीकरण करण्यात आले. कळसूबाईचे शिखरावर वीजही नेण्यात आली आहे. आता कळसूबाई शिखरावर रोप वे नेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
यासंदर्भात कळसूबाई मित्रमंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे, समता परिषदेचे अध्यक्ष शिवाभाऊ काळे यांच्यासह अन्य पदाधिकार्यांनी ना. भुजबळ यांची भेट घेतली. त्यावर त्यांनी आश्वासन दिले. रोप वेची मागणी मान्य झाल्यास येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे.