अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शनिवारी रात्री ते रविवारी सकाळपर्यंत मुसळधार पावसाने नगर शहरा लगत वाहणार्या सीना नदीने धोक्याची पातळी ओलांडून पुराचे पाणी कल्याण रोडवरील अनेक वसाहतीमध्ये घुसले. परिणामी काही ठिकाणच्या नागरिकांना स्थलांतर करावे लागले, तसेच त्यांच्या संसारोपयोगी साहित्यांचे नुकसानही झाले. सुमारे 30 वर्षांच्या खंडानंतर सीना नदीला एवढा मोठा पूर आला. दरम्यान कल्याण रोडवर रविवारी चक्क होडीचा वापर करून नागरिकांना मदत कार्य करण्याची वेळ आली. सायंकाळी उशीरापर्यंत मनपाच्या रेस्क्यू टिमसह अग्नीशमन विभागाच्या जवानांनी अनेक कुटूंबाना पूराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले.
शनिवारी रात्रीच्या मुसळधार पावसानंतर रविवारी सकाळी सातच्या सुमारास नगर शहरातील कल्याण रोडवरील सीना नदीपात्रालगत असलेल्या दिल्लीगेट भागातील बागरोजा हडको, कल्याण रस्ता, वारुळाचा मारुती, दातरंगे मळा, माधव नगर भागातील वसाहती, स्टेशन रस्त्यावरील आनंदनगर, पुणे रस्त्यावरील रवीश वसाहत, सारसनगरमधील भिंगार नाला लगतच्या वसाहती या ठिकाणी पुराचे पाणी घुसले होते. दरम्यान, बाबात माहिती आ. संग्राम जगताप, खा. नीलेश लंके, मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी परिस्थितीची पाहणी केली. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने बोटीच्या सहाय्याने वारुळाचा मारुती, दातरंगे मळा परिसरातील नागरिकांना बाहेर काढले. अनेक नागरिकांनी इमारतीच्या, घराच्या छतावर आश्रय घेतला होता. 1996 नंतर प्रथमच एवढा मोठा पूर आल्याची चर्चा वयोवृद्ध नागरिक करत होते.
सीना नदीच्या उगमाजवळ असलेला पिंपळगाव तलाव ओसंडून वाहू लागल्यानंतर सीना नदीच्या पुराच्या पाण्यात वाढ झाली. नगर शहर व परिसरास शनिवारी दुपारपासूनच पावसाने झोडपून काढले. रात्रभर मुसळधार पाऊस सुरू होता. रविवारी सकाळी पाऊस ओसरला. मात्र नदीच्या उगमाजवळ जेऊर परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने पुराच्या पाण्यात सकाळी वाढ झाली व ते लगतच्या वसाहतींमध्ये घुसले. शहरातील कल्याण रस्त्यावरील सीना नदीवरील पुलाचे काम मार्गी न लागल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद होती. यापूर्वीही ती वेळोवेळी बंद पडलेली आहे. पुराचे पाणी नेप्ती नाका चौक, अमरधामजवळ पोहोचल्याने आयुर्वेद महाविद्यालयाकडून नेप्ती चौकाकडे जाणारा व दिल्लीगेटकडून अमरधामकडे येणारा रस्ता बंद करण्यात आला होता. तेथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
स्टेशन रस्त्यावरील जुना लोखंडी पूलही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. तेथेही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आयुर्वेद महाविद्यालयाकडून काटवन खंडोबाकडे जाणारा पूलही पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला होता. आयुक्त डांगे यांनी आपत्कालीन यंत्रणांना सतर्क राहण्याच्या तसेच नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, सायंकाळी काही कुटूंबासह मनपाच्या एका कर्मचार्याची पूराच्या पाण्यातून सुटका करण्यात आल्याची माहिती मनपा अग्नीशमन विभाग व मनपाच्या रेस्क्यू टिमचे शंकर मिसाळ यांनी दिली.




