माळवाडगाव |वार्ताहर| Malwadgav
गोदावरी नदीवरील कमालपूर केटीवेअर बंधार्यावरून मोटारसायकलसह पाण्यात बुडालेल्या दुर्घटनेतील तीनपैकी उर्वरित दोघांचे मृतदेह शोधण्यात पथकाला यश आले आहे. एकाचा मृतदेह सकाळी 9 वाजता तर दुसर्याचा दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास सापडला. यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथकातील जवानांनी अथक परिश्रम घेतले. काल विजयादशमी दसरा सणाच्या दिवशी श्रीरामपूर तालुक्यातील कमालपूर येथील आदिवासी परिवारातील एकमेकांचे नातेवाईक असलेले चौघे जण एकाच मोटारसायकलवरून शेतमजुरीचे काम आटोपून घराकडे निघाले होते. बंधार्यावर काँक्रिटचे खोल खोल खड्डे असल्याने सायंकाळच्या सुमारास चालकाचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले.
मोटारसायकल अन् एका वृध्द महिलेसह चौघेही लोखंडी ढापेच्या बाजूने पात्रातील पाण्यात पडले. सुर्यास्तासमयी घटना घडल्याने हा प्रकार लक्षात आल्यावर शेजारच्या मच्छीमार बांधवांसह स्थानिकांना मच्छिंद्र गोपीनाथ बर्डेे याला वाचविण्यात यश आले होते. घटनेनंतर तासाभरात वेणुबाई मनोहर बर्डे (वय 70) या महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. रात्री उशीरापर्यंत बॅटरीच्या उजेडात शोध घेण्याचा प्रयत्न असफल होत असल्याने मदतकार्य थांबविण्यात आले. छत्रपती संभाजीनगर येथून आपत्ती व्यवस्थापन पथक आल्यानंतर सकाळी 9 वाजेच्या सुमारास रवी सोमनाथ मोरे यांचा मृतदेह सापडला.
पथकाच्या बोटीने बराच वेळ शोध मोहीम सुरू केल्यानंतर दुपारी 1.30 च्या दरम्यान दिलीप सोमनाथ बर्डे याचा मृतदेह हाती लागला. शोध मोहीम सुरू असताना गोदावरी नदीकाठावर नागरिकांनी गर्दी केली होती. विरगांव (वैजापूर) प़ोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील, हवालदार भालेराव, मोरे यांनी पंचनामा केला. तीनही मृतदेहांचे शवविच्छेदन श्रीरामपूर येथे करण्यात आले. कमालपूर येथे सकाळी वृध्द वेणुबाई महिलेवर दुपारी रवी बर्डे याच्यावर तर सायंकाळी उशीराने दिलीप मोरे याच्या मृतदेहावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.