अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
तालुक्यातील कामरगाव शिवारात मुक्कामी असलेल्या एका मेंढपाळ कुटुंबाला लुटल्याची घटना समोर आली आहे. तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवत 1 लाख 42 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात रविवारी (7 डिसेंबर) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिध्दु बिरू घुले (वय 60, रा. कुरूंद, ता. पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे. सिध्दु घुले या मेंढपाळाचे कुटुंब अनिल ठोकळ यांच्या कामरगाव शिवारातील शेतात मेंढ्यांसह मुक्कामी होते. 27 नोव्हेंबरच्या मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या वाघुरतळावर येऊन पिशव्यांची उचकापाचक केली. चोरट्यांनी 40 हजार रूपयांची रोख रक्कम, 18 ग्रॅमचे सोन्याचे दागिने यामध्ये राजकड्या, बाळी, डोरले, शिंपल्या, तसेच 27 ग्रॅमचे सोन्याचे दागिने यामध्ये नथ, डोरले, शिंपल्या, कुडके, इलेक्ट्रीक बॅटरी, याशिवाय आधारकार्ड, पॅनकार्ड, बँकेचे पुस्तक आणि दुचाकीचे कागदपत्रे असा एकुण एक लाख 42 हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे.
यासंदर्भात घुले यांनी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तीन ते चार चोरट्यांविरूध्द घरफोडीचा गुन्हा रविवारी (7 डिसेंबर) दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे अधिक तपास करीत आहेत.
गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ
घटना 27 नोव्हेंबरच्या रात्री घटना घडली असून फिर्यादीने अहिल्यानगर तालुका पोलिसांना माहिती देऊन देखील त्यांच्याकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन यांच्यावतीने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना आंदोलनाबाबत निवेदन देण्यात आल्यानंतर पोलिसांनी रविवारी (7 डिसेंबर) गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्यामुळे आज (मंगळवार) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच यासंदर्भात आ. गोपीचंद पडळकर यांना माहिती देण्यात आली असून ते हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार असल्याची माहिती सखाराम सरक यांनी दिली.





