चांदा |वार्ताहर| Chanda
नेवासा तालुक्यातील चांदा येथील एका वस्तीवर कंदुरी कार्यक्रमाच्यावेळी झालेल्या वादातून गोळीबार झाला. त्यात शाहिद शेख याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने चांदा परिसर हादरला आहे. आरोपी पसार झाले असून पोलिस त्यांचा कसोसीने शोध घेत आहेत.
काल 11 जानेवारी 2025 रोजी चांदा शिवारात सुरज लतीफ शेख याच्या चारी क्रमांक सहा जवळील वस्तीवर कंदुरीचा कार्यक्रम असल्यामुळे यातील मयत इसम शाहिद राज महंमद शेख (वय 23)हा सदर कार्यक्रमात बोकड कापण्यासाठी गेलेला होता. या ठिकाणी सायंकाळी 4.45 ते 7 वाजण्याच्या सुमारास मयत शाहिद शेख तसेच सुरज लतीफ शेख व अक्षय जाधव यांच्यात वाद झाले. नंतर हे वाद इतके विकोपाला गेले की आरोपींनी अग्निशस्त्रातून फायर करून शाहिद राजमहंमद शेख याचा खून केला आहे, अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.
मृतदेह पोस्टमार्टमसाठी अहिल्यानगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला होता. या घटनेतील आरोपी घटनेनंतर पसार झाले. शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आले आहे. रात्री गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, घटनेची माहिती कळताच शनि शिंगणापूर येथील पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधिक्षक सोमनाथ वाघचोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. तसेच आरोपींना पकडण्याच्या सूचना केल्या. या घटनेने चांदा आणि परिसरात गावठी कट्टे असल्याच्या संशयाला बळकटी मिळत आहे. पोलिसांनी गावठी कट्ट्यांचा शोध लावून दहशत करणार्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून होत आहे.




