Monday, November 25, 2024
Homeमनोरंजनकंगना रनौत झाली ट्रोल; नेत्यांसह कलाकारांनी फटकारले !

कंगना रनौत झाली ट्रोल; नेत्यांसह कलाकारांनी फटकारले !

काही दिवसांपूर्वी अभिनेती कंगना रनौतने(Kangana Ranaut) मुंबई आणि मुंबई पोलिसांबाबत(Mumbai and Mumbai Police) वादग्रस्त वक्तव्य केले होते. “याआधी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?” असा सवाल तिने केला होता. या वक्तव्यावरून तिच्या विरुद्ध अनेक कलाकार, राजकारणी यांनी संताप व्यक्त केला आहे.

या काही मेंटल केस मुंबईत वाढल्या आहेत, त्यांच्यावर आरोग्य खात्याने उपचार करावे – खा. संजय राऊत

- Advertisement -

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत व कंगनामध्ये सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून ट्विटर वॉर सुरु आहे. कंगनाने राऊत यांच्यावर धमकी मुंबईत न येण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “ही मुंबई 106 हुतात्मांनी मिळवली आहे. या मुंबईचं रक्षण आमच्या पोलिसांनी केलं आहे. 26/11 हल्ला मुंबई पोलिसांनी परतवला, कसाबला याच पोलिसांनी पकडलं, अशा या मुंबई पोलिसांबद्दल कुणीही ऐरे-गैरे काहीही बोलत असतील, तर त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी. मी पोकळ धमक्या देत नाही, मी शिवसैनिक आहे, अ‍ॅक्शनवाला माणूस, नौटंक्या करत नाही, या काही मेंटल केस मुंबईत वाढल्या आहेत, त्यांच्यावर आरोग्य खात्याने उपचार करावे आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी कारवाई करावी.” अश्या शब्दात त्यांनी कंगनाला खडसावले आहे.

तसेच ट्विट करता त्यांनी म्हंटले आहे की, “मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे…ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा..शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही. promise. जय हिंद जय महाराष्ट्र.”

कंगनाला महाराष्ट्रासह मुंबईत राहण्याचा अधिकार नाही – गृहमंत्री अनिल देशमुख

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज मीडियाशी संवाद साधताना कंगनावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहे. ते बोलताना म्हणाले, “कंगनाने मुंबई पोलिसांची बदनामी केलीय. त्यामुळे कंगनाला महाराष्ट्रासह मुंबईत राहण्याचा अधिकार नाही. कंगनामुळे मुंबई पोलिसांची बदनामी होत आहे. आमचे पोलीस अधिकारी तिच्या विधानाची पाहणी करतील आणि त्यानंतर काय तो निर्णय घेतील.” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

भारतीय जनता पक्ष कंगनाच्या या विधानाशी अजिबात सहमत नाही – आ. आशिष शेलार

भाजपा नेते व आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी देखील पत्रकार परिषदेत “कंगनाने मुंबई, मुंबईकर आणि महाराष्ट्रातील जनतेला शिकवण्याचा प्रयत्न करु नये. भारतीय जनता पक्ष कंगनाच्या या विधानाशी अजिबात सहमत नाही” असे म्हंटले आहे.

तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत – शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक

शिवसेना आमदार यांनी देखील ट्विट करत कंगनाला इशारा दिला आहे. त्यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे, “कंगनाला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली आहे. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे.”

..हे म्हणजे उचलली जीभ आणि लावली टाळ्याला – रेणुका शहाणे

कंगनाच्या त्या ट्विटरवर प्रतिक्रिया देताना रेणुका यांनी म्हंटले आहे, “प्रिय कंगना, मुंबई हे ते शहर आहे तिथे तुझं बॉलिवूड स्टार होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. या शहराचा तू थोडा तरी मान ठेवावा अशी अपेक्षा आहे. तू मुंबई आणि पीओकेची तुलना केली हे पटल नाही. हे म्हणजे उचलली जीभ आणि लावली टाळ्याला,” असा टोला त्यांनी लगावला आहे.

केवळ कृतघ्न लोकच मुंबईची पीओके सोबत तुलना करु शकतात – अभिनेत्री उर्मिला मातोंडकर

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने देखील ट्विट करत निशाना साधला आहे. उर्मिला मातोंडकरने ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “महाराष्ट्र हा देशाचा सांस्कृतिक आणि बौद्धिक चेहरा आहे. महान छत्रपती शिवाजी महाराज यांची ही भूमी आहे.. मुंबईने लाखो भारतीयांचे पालन पोषण केले आहे आणि त्यांना नाव, प्रसिद्धी मिळवून दिली आहे. केवळ कृतघ्न लोकच मुंबईची पीओके सोबत तुलना करु शकतात. हे सगळं अत्यंत स्तब्ध आणि हैराण करणारं आहे.”

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या