मुंबई –
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने मुंबई महापालिकेविरोधात 2 कोटींचा दावा केला आहे. मुंबईतील कार्यालयावर केलेल्या कारवाईनंतर कंगनाने
पालिकेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावर 22 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
कंगनाला वांद्रे येथील तिच्या कार्यालयात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी 8 सप्टेंबरला मुंबई महानगरपालिका कायद्यातील कलम 354(अ) नुसार नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर कंगनाच्या वकिलांनी दिलेली कागदपत्रे समाधानकारक नसल्याचे सांगत पालिकेने 9 सप्टेंबरला सकाळी कार्यालय तोडण्यास सुरुवात केली. कंगनाच्या कार्यालयात 12 अनधिकृत बांधकामे असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला. परंतु याला विरोध करत कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
यानंतर कारवाईला स्थगिती मिळाली. परंतु या कारवाईविरोधात कंगनाने पुन्हा मुंबई महापालिकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले. मुंबई महापालिकेच्या बेकायदेशीर कारवाईदरम्यान दुर्मिळ सामानांचं आणि वस्तूंचं नुकसान झाल्याचा आरोप कंगनाने केला आहे.
त्यानुसार एकूण मालमत्तेच्या 40 टक्के भागाचं नुकसान झाल्याचं तिने याचिकेत नमूद केलं आहे. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला येत्या गुरुवारपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानंतर पुढील मंगळवारी याप्रकरणी सुनावणी होणार आहे.