मुंबई:
शिवसेनेशी झालेला वाद आणि मुंबई महापालिकेने तिच्या कार्यालयावर केलेली कारवाई या पार्श्वभूमीवर अभिनेत्री कंगना राणावतने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. दरम्यान या भेटीमध्ये नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाली याविषयी माहिती अद्याप समोर आलेली नाही.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांना राज्यपालांनी राजभवनवर बोलवून घेतले होते. राज्यपालांनी अजोय मेहता यांच्याशी कंगना हिच्या घरावर झालेली कारवाई आणि या प्रकरणी सरकारची भूमिका याबाबत झाली चर्चा केली. भेटीनंतर माध्यमांशी बोलतांना कंगना म्हणाली, मी माझी कैफियत मांडली आहे. माझ्यावर अन्याय झाला असून राज्यपालांनीही माझे म्हणणे ऐकून घेतले आहे. त्यामुळे मला न्याय मिळेल अशी आशा आहे. माझ्यासी अभद्र व्यवहार झाला असून मला न्याय मिळायला हवा. मला न्याय देणे देशभरातील महिलांसाठी महत्त्वाचे आहे, असेही तिने सांगितले.
काय आहे प्रकरण
सुशांतसिंग वादावरुन कंगनाने शिवसेनेवर व मुंबई पोलिसांवर टीका केली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम दाखवत पालिकेने त्यावर हातोडा चालवला. त्यानंतर आता कोर्टाने परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले होते. कंगनाच्या याचिकेवर २२ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.