मुंबई l Mumbai
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत ज्याप्रकारे तिच्या वादग्रस्त कमेंट्समुळे चर्चेत असते तशीच ती तिच्या विविधांगी भूमिकांमुळेही असते. २०१९ मध्ये कंगना रनौत राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेत दिसली होती.
त्यानंतर आता कंगना रनौत देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र कंगना इंदिरा गांधी यांची भूमिका ज्या चित्रपटात साकारणार आहे, तो बायोपिक नसणार आहे, अशी माहिती मिळत आहे.
कंगना रनौतने आपल्या ट्विटरवरून ही गोष्ट जाहीर केली आहे. कंगना रनौतने सांगितले आहे की, हा चित्रपट तिचे प्रोडक्शन हाऊस मणिकर्णिका फिल्म्स निर्मित करेल. कंगना रनौतने एका फॅन पेजचे ट्विट रिट्विट करत लिहिले आहे की, ‘माझ्या करिअरच्या सुरुवातीला एका आयकॉनिक महिलेबद्दल केलेले हे फोटोशूट आहे. त्यावेळी मला माहित नव्हते की एक दिवस मला त्यांची भूमिका पडद्यावर साकारण्याची संधी मिळेल.’ कंगना रनौतने शेअर केलेल्या ट्विटमध्ये ती इंदिरा गांधींच्या लूकमध्ये दिसली आहे. कंगनाच्या या इंदिरा गांधी यांच्यावरील चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झाले नाही.
या चित्रपटात इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळातील दोन मोठे निर्णय आणीबाणी आणि ऑपरेशन ब्लूस्टारदेखील दर्शविले जाणार आहेत. कंगनासोबत पूर्वी काम केलेले डायरेक्टर साई कबीर, हे या चित्रपटाचेही दिग्दर्शन करतील. याच बरोबर त्यांनी स्क्रिप्टदेखील लिहिली आहे. हा चित्रपट ग्रँड लेवलवर तयार होणार आहे. यात संजय गांधी, राजीव गांधी, मोरारजी देसाई आणि लाल बहादूर शास्त्रींसारख्या अनेक नेत्यांच्या भूमिका आहेत. कंगना रनौत सध्या भोपाळ येथे धाकड चित्रपटाचे शूटिंग करत आहे. यानंतर ती तेजसमध्ये दिसेल. याशिवाय तिने नुकतेच ‘अपराजित अयोध्या’ आणि ‘मणिकर्णिका रिटर्न्स’ चीही घोषणा केली आहे.