सोनई |वार्ताहर| Sonai
सोनई-कांगोणी रस्त्यावरील गोसावी मळ्यातून घरफोडी होऊन घरातील साहित्य चोरट्याने चोरून नेल्याच्या फिर्यादीवरून सोनई पोलिसांनी तपास करत आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे.
फिर्यादी गणेश भीमपुरी गोसावी रा. कांगोणी रोड (सोनई) यांच्या घराचा दरवाजा लोखंडी हत्याराने उचकटून घरात प्रवेश करून घरातील सॅमसंग कंपनीचे फ्रिज, भारत कंपनीची गॅस टाकी, गव्हाचे 50 कि.ग्रॅम वजनाचे 8 कट्टे, साखरेचा एक कट्टा, लहानमोठी स्टिलची व पितळेची भांडी तसेच फिर्यादी यांचे शेजारी राहणारे सचिन लक्ष्मण माने यांचेही घरातील एच. पी. कंपनीच्या दोन गॅस टाक्या व पितळाची भांडी असा एकूण 35,400 रु. किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. फिर्यादीच्या फिर्यादीवरून सोनई पोलीस स्टेशन गु.र.नं. 361/2023 भा.द.वि. कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना गोपनीय बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा संतोष दत्तू मोरे रा.पिसाळ मळा (सोनई) याने व त्याच्या साथीदारांनी मिळून केला. त्याबाबत त्यांनी तपास पथकाला माहिती देऊन आरोपीचा शोध घेण्यास सांगितले. तपास पथकाने आरोपीच्या घरी जाऊन त्यास तपासकामी ताब्यात घेतले असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. त्याच्यासोबत असणारा साथीदार सागर चांगदेव शिंदे रा. सोनई या आरोपीसही मुद्देमालासह अटक करण्यात आली.
आरोपींकडून 2000 रु. किमतीची भारत गॅस कंपनीची लाल रंगाची गॅस टाकी, 2200 रु.किमतीच्या अंगावर घेण्याच्या 11 चादरी, 5000 रु.किमतीचे सॅमसंग कंपनीचे राखाडी रंगाचे फ्रीज, 6000 रु.किमतीचे गव्हाचे 50 कि.ग्रॅ. वजनाचे 4 कट्टे असा एकूण 15 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याकामी पुढील तपास पोलीस नाईक बाळासाहेब बाचकर करत आहेत.
सदरची कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात तसेच पोलीस नाईक बाळासाहेब बाचकर, कॉन्स्टेबल अमोल जवरे, ज्ञानेश्वर आघाव, रवि गर्जे, निखील तमनर यांनी केली.