नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये एका महिन्याच्या आत दुसऱ्यांदा रेल्वे अपघात घडवून आणण्याचा कट उधळून लावण्यात यंत्रणांना यश आले आहे. रविवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास कानपूर ते शिवराजपूर दरम्यान रेल्वे ट्रॅकवर सिलेंडर ठेवून त्याचा स्फोट घडवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. लोको पायलटच्या सतर्कतेने मोठे संकट टळले. रेल्वे ट्रॅकवर एक एलपीजी गॅस सिलेंडर उलटा ठेवला होता. त्यानुसार सिलेंडर स्फोट करुन रेल्वे उडवण्याचा प्रयत्न असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी दोन व्यक्तींची चौकशी सुरु असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ सप्टेंबर रविवारी रात्री८.३० च्या सुमारास कालिंदी एक्स्प्रेस अनवरगंज-कासगंज रेल्वे मार्गावर बर्राजपूर आणि बिल्हौर दरम्यान रेल्वे ट्रॅकवर एलपीजी गॅस सिलेंडर, काचेच्या बाटलीत ज्वलनशील पदार्थ आणि पांढर्या रंगाचं रसायन देखील सापडले आहे. या एक्स्प्रेसच्या लोको पायलटने सिलेंडर पाहून इमरजन्सी ब्रेक लावला, मात्र ट्रेन वेगात असल्याने ती सिलेंडरला धडकली, या धडकेत सिलेंडर बाजूला जाऊन पडले. या धडकेनंतर सिलेंडर न फुटल्याने अनेकांचा जीव वाचला.
या घटनेची माहिती मिळताना दहशतवादी विरोधी पथक आणि इतर तपास यंत्रणांच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तपास सुरु केला. दहशतवादीविरोधी पथकाच्या कानपूर आणि लखनऊमधील तुकड्या घटनास्थळी पोहचल्या असून पुरावे गोळा करत आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अनवरगंज पोलीस स्टेशनचे रेल्वे अधीक्षक, आरपीएफ आणि अन्य रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
अर्धा तास थांबल्यानंतर गाडी रवाना करण्यात आली. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी येऊन तपास केला. सर्व संशयास्पद वस्तू तपासासाठी पाठवण्यात आल्या आहेत. घटनास्थळी पोहोचलेले अतिरिक्त आयुक्त हरीश चंद्र यांनी हे कृत्य कोणी केले असेल त्याला पकडण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले. सध्या सर्वच ठिकाणी तपास सुरू आहे. फॉरेन्सिक टीमही तपशीलवार आढावा घेत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी कानपूर-झांशी मार्गावरील साबरमती एक्सप्रेसचे २२ डब्बे मार्गावरुन घसरले होते. बोल्डर इंजिनला धडकल्याने अपघात झाल्याचे या गाडीच्या ड्रायव्हरने सांगितले होते. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी किंवा गंभीर दुखापत झाली नव्हती. आता असाच प्रकार पुन्हा घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा