रामकृष्ण पाटील,कापडणे – एखाद्या आरोपीला डांबून ठेवावे अशी वागणूक संस्थात्मक विलगीकरण कक्षात मिळत असेल तर आम्ही राहायचे तरी कसे ? असा सवाल कक्षातील संशयितांनी आज दि.5 जुलै रोजी लोकप्रतिनिधी व तालुका आरोग्याधिकार्यांसमोर केला. एकच शौचालय त्यातही घाणीचे साम्राज्य, जेवणाची होणारी आबाळ हे पाहुन असे वाटते की आम्ही काय पाप केले म्हणून आम्हाला अशी वागणूक मिळतेय असा सवालही यावेळी करण्यात आला. नगावबारी परिसरातील छगनमल बाफना मेमोरीयल आयुर्वेदिक महाविद्यालयातील 15 संशयित अचानक घरी निघुन गेले होते. यानंतर मुकटी येथील जि.प.सदस्य व पं.स.सदस्यांनी येथे भेट दिल्यानंतर या संशयितांनी या भावना व्यक्त केल्या. यावेळी अनेकांना रडू कोसळले.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील 15 जणांना या बाफना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. यातील हेंकळवाडीचे सात व मुकटीच्या नऊ जणांनी अचानक पोबारा केल्याने आरोग्य विभागाची जमिनीखालची वाळूच सरकली. शोधाशोध सुरु असतांनाच मुकटीच्या संशयितांना घेऊन लोकप्रतिनिधींनी स्वत:हुन हे कोवीड केअर सेंटर गाठले. परंतू येथील येथील परिस्थिती पाहुन लोकप्रतिनिधींनीही आरोग्य यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर सवाल उभा केला.
यात मुकटी जि.प.सदस्यांचे प्रतिनिधी विशाल दिलीप पाटील, पं.स.सदस्य पंढरीनाथ पाटील, माजी सरपंच उमाकांत पाटील, राजेंद्र पाटील आदींनी यावेळी या सेंटरची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य आढळले. केवळ दोन तीनच आरोग्य कर्मचारी येथे उपस्थित राहत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी आपल्या व्यक्त करतांना या संशयितांना रडू कोसळले. आमचा बाप कोरोनाने मेला, घरात दुख:चे वातावरण असतांना आम्ही स्वत:हून येथे दाखल झालो पण आम्हाला मिळणारी वागणुक अतिशय वाईट आहे. आम्ही काय पाप केले म्हणून आम्हाला ही आरोपीसारखी वागणूक मिळत आहे. लहान-लहान मुल, महिला यामुळे जास्त आजारी होतील की काय? अशी भिती वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. अशा वातावरणात राहायचे तरी कसे आणि आमची प्रतिकारशक्ती काम तरी काय करेल असा सवालही यावेळी करण्यात आला.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.तरम्मुन पटेल यांच्या समोर रडू कोसळल्यावरही त्यांनी दिलासा देण्याऐवजी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने संशयितांचे अजून मनोर्धेर्य खचल्याचे यावेळी सांगण्यात आले.
एखाद्या आरोपीला तरी चांगली वागणूक मिळत असेल इतकी वाईट परिस्थिती या विलगीकरण कक्षास भेट दिल्यानंतर दिसली. या ग्रामस्थांना राहण्याची इच्छा असूनही तिथल्या बिकट परिस्थितीने त्यांना घरी जाण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांना योग्य सोयी-सुविधा द्याव्यात व त्यांच्याविरुध्द कोणतीही कायदेशिर कारवाई करु नये, यामुळे त्यांची मानसिकता ढासळू शकते. आरोग्याधिकार्यांनी गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देण्याऐवजी येथील समस्या सोडविण्यावर भर द्यावा.
पंढरीनाथ पाटील,पं.स.सदस्य, मुकटी गण