नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
मनपा निवडणुकीमध्ये भाजप, शिंदे गट आणि मागून अजित पवार गटाची बिनविरोध उमेदवार निवडून आणण्यासाठी स्पर्धाच लागली आहे. मात्र हे अनधिकृत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. इतकेच नव्हे तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा धमकी देणारा व्हिडिओ सुद्धा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियामध्ये व्हायरल केला आहे. दुसरीकडे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडूनही उमेदवारांना धमकावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान, आता ज्येष्ठ विधिज्ज्ञ कपिल सिब्बल यांनीही महाराष्ट्रातील बिनविरोध पायंड्यावर सडकून प्रहार केला आहे. त्यांनी ट्विट करत आपली निवडणूक व्यवस्था संकटात सापडत चालली असल्याचे म्हटले आहे.
राज्यातील २९ महापालिकांमध्ये ६७ ठिकाणी बिनविरोध निवड झाल्याबद्दल शंका उपस्थित करण्यात आली आहे. विरोधकांकडून गंभीर आरोप करण्यात आले आहे. पैसे देऊन, पोलिसी दबाब टाकून माघार घ्यायला लावल्याचे आरोपही विरोधकांनी केले आहेत. महाराष्ट्रातील या निकालांबद्दल खासदार कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाला सवाल केला आहे.
निवडणूक आयोग याबद्दल खरेच चिंतेत आहे का?
“महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये ६९ जागांपैकी भाजपा आणि शिंदेसेनेचे तब्बल ६८ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ही परिस्थिती पाहता आपली निवडणूक व्यवस्था सध्या गंभीर संकटात आहे. निवडणूक निकालांवर पैसा आणि राजकीय वर्चस्व यांचाच मोठा प्रभाव दिसून येत असून, तेच निकालांची दिशा ठरवत आहेत. निवडणूक आयोग याबद्दल खरेच चिंतेत आहे का?”, असा सवाल कपिल सिब्बल यांनी केला आहे.
उध्दव ठाकरेंनी केली टीका
दरम्यान, बिनविरोध निवडणूक पायंड्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आज हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांच्या दमदाटीवरून राजीनाम्याची मागणी केली. बिनविरोध झालेल्या जागांवरही त्यांनी निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल करताना पश्चिम बंगालची आठवण करून दिली. राज्यकर्त्यांकडून आपण करत असलेल्या कृतीने चुकीचे पायंडे पाडत नाही आहोत ना, याचे भान सुटता कामा नये, असे म्हटले.




