Wednesday, July 29, 2026
Homeक्राईमKarjat : कर्जत वनक्षेत्रात तीन हरणांची शिकार

Karjat : कर्जत वनक्षेत्रात तीन हरणांची शिकार

दोन मयत, एकाचा जीव वाचला || महिलेसह पाच जणांवर गुन्हा दाखल

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

तालुक्यातील चांदे-बिटकेवाडी शिवारात तीन हरणांची शिकार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. रात्रीच्या चोर्‍या व घरफोड्यांवर नियंत्रणासाठी सुरू असलेल्या गस्तीदरम्यान मिरजगाव पोलीसांनी एका हरणाची शिकार करून दोन जिवंत हरिण घेऊन जाणार्‍या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन हरिणांचे प्राण वाचवण्यात पोलिसांना यश आले, मात्र एका हरणाचा मृत्यू झाला.

- Advertisement -

याप्रकरणी वनविभागाने चार पुरुष व एका महिलेविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. मागील काही दिवसांपासून मिरजगाव परिसरात रात्रीच्या वेळी चोरी व घरफोड्यांचे प्रमाण वाढले होते. त्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे तसेच कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी स्वतंत्र गस्त पथक नेमले होते.
दि. 3 मार्च 2026 रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चांदे-बिटकेवाडी जंगल परिसरात गस्त घालत असताना दोन दुचाकींवरून जाणारे चार पुरुष व एक महिला संशयास्पद आढळले.

पोलिसांनी पाठलाग करताच एका दुचाकीवरील दोघांनी गाठोडे व दुचाकी टाकून अंधाराचा फायदा घेत पळ काढला, तर दुसर्‍या दुचाकीवरील संशयित फरार झाले. घटनास्थळी आढळलेल्या गाठोड्यांची तपासणी केली असता, त्यामध्ये शिकार करून ठार मारलेले एक हरिण तसेच पाय व तोंड बांधलेल्या अवस्थेत दोन जिवंत हरिण आढळली. यापैकी एका जिवंत हरिणास तात्काळ नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी संकेत उगले, वनरक्षक सागर वाकचौरे, आजिनाथ ननावरे, हरिभाऊ बारगजे व दिनकर लिलके यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जप्त केलेली दुचाकी, हरिण पकडण्यासाठी वापरलेली जाळी, दोरी, शाल, मोबाईल हँडसेट तसेच जिवंत व मृत हरिण असा सर्व मुद्देमाल वन विभागाच्या ताब्यात दिला. ही कारवाई प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुनिल खैरे, गोकुळ पळसे, राजेंद्र गाडे तसेच वन विभागाच्या पथकाने संयुक्तरीत्या केली.

ताज्या बातम्या