कर्जत |गणेश जेवरे|Karjat
राज्याचे लक्ष असलेल्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये अटीतटीच्या लढतीमध्ये अखेर भूमिपुत्र विरुद्ध विकास पुत्र संघर्षात रोहित पवार यांचा विजय झाला आहे. मात्र, या विजयामध्येे राजेंद्र देशमुख हे खर्याअर्थाने या मतदारसंघांमध्ये गेमचेंजर ठरले. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली. रणधुमाळी सुरू झाली आणि देशमुख यांनी राम शिंदे यांची साथ सोडत राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. मतदारसंघामध्ये ही सर्वात मोठी राजकीय घडामोड ठरली. देशमुख यांनी हजारो समर्थकांचा मेळावा घेत पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला आणि हाच निर्णय या मतदारसंघांमध्ये पवार यांच्या विजयाची नांदी ठरला.
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही यावर्षी अनेक मुद्द्याने गाजली. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच रोहित पवार यांचे शिलेदार टप्प्याटप्प्याने त्यांना सोडून राम शिंदे यांच्यासोबत गेले. काहीजण पक्षात असूनही त्यांनी पवार यांना साथ दिली नाही. या निवडणुकीत बाहेरील उमेदवार, बारामतीचे पार्सल, युवराज पुत्र, भूमिपुत्र, विकासपुत्र, खुळ्या, येड्या अशा शेलक्या शब्दांत कमरेखाली वार करण्यात आले. सोशल मीडियावर तर प्रचाराची पातळी इतक्या खालच्या पातळीवर घसरली होती की वैयक्तिक पातळीवर दोन्हीही पक्षातील कार्यकर्त्यांनी एकमेकांवर टीका केली. या मतदारसंघाची निवडणूक आ. पवार व आ. शिंदे यांनी प्रतिष्ठेची केली. साम, दम, दंड भेद या आयुधांचा वापर दोन्ही पक्षांकडून करण्यात आला. पवार यांना रोखण्यासाठी भाजपने शिंदे यांना विधान परिषदेची आमदारकी दिली. याचा फायदा भाजपला निवडणुकीत दिसून आला.
दोन्ही गटाकडून प्रचाराचे तंत्र, सभांचे नियोजन यामध्येही कौशल्य वापरल्याचे दिसून आले. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन केले आणि लोकसभा निवडणुकीमध्ये त्याचा मोठा फटका महायुतीला बसला. ही बाब लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाचा असणारा विरोध पाहता राम शिंदे यांनी फडणवीस यांच्यामुळे मराठा समाजातील मतदान विरोधात जाऊ नये, यासाठी त्यांना मतदारसंघातील प्रचारापासून दूर ठेवले. याचा काही प्रमाणात फायदा शिंदे यांना होताना दिसला. मतदारसंघामध्ये शेवटच्या फेरीपर्यंत मोठी चुरस होती. प्रत्येक फेरीमध्ये चित्र बदलत होते. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत होती. अनेकजण देव पाण्यात घालून बसले होते. शेवटची फेरी राशीन जिल्हा परिषद गटामध्ये संपणार होती. क्रिकेटच्या चुरशीच्या सामन्यामध्ये शेवटची ओव्हर कोण टाकणार. किती बॉलमध्ये किती विकेट घेणार आणि किती धावा देणार याचे विश्लेषण ज्याप्रमाणे असते.
तसेच चित्र निर्माण झाले होते. अन् राशीन जिल्हा परिषद गटाचे मतदानाचे यंत्र उघडण्यात आले आणि विजयाचे समीकरण बदलले. राशीन जिल्हा परिषद गटामध्ये पवार यांना चांगले मताधिक्य मिळाले. शिंदे यांची आघाडी मोडून त्यांनी विजय मिळवला. या जिल्हा परिषद गटामध्ये शिंदे यांच्यासोबत असणारे देशमुख निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर त्यांना सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये आले. बारामतीमध्ये त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. राजेंद्र देशमुख यांचे आजोबा बापूसाहेब देशमुख यांचे मतदारसंघांमध्ये पूर्वी असणारे राजकीय नेत्यांबरोबरचे हितसंबंध याची मोठी मदत राजेंद्र देशमुख यांच्या माध्यमातून रोहित पवार यांना झाली. यामुळे या मतदारसंघामध्ये देशमुख हे रोहित पवार यांच्या विजयासाठी गेम चेंजर ठरले. देशमुख यांच्यासोबतच श्याम कानगुडे व शाहूराजे भोसले यांचेही योगदान मोठे आहे.
या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा समोर आला तो म्हणजे विकासापेक्षा जातीय समीकरण फार महत्त्वाचे ठरले. ज्या पद्धतीने गावांमध्ये मतांची आकडेवारी समोर आली, ती पाहता विकास कामांपेक्षा जातीय समीकरणालाच महत्व दिल्याचे दिसून आले. मतदारसंघामध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये असणारी तडजोडीच्या राजकारणाची सवय, रोहित पवार यांना खटकत होती. यामुळे त्यांनी या नेत्यांना विरोध करण्यापेक्षा त्यांना दूर ठेवले. मात्र, यामुळे स्व पक्षातील नेते नाराज झाले. कोणीही नसताना पक्ष आम्ही सांभाळला, चालवला ही भावना या ज्येष्ठ नेत्यांमध्ये होती आणि नाराजी वाढत गेल्यानंतर या सर्वांनी पवार यांना सोडून शिंदे यांच्यासोबत जाण्यास सुरुवात केली. तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाराजीची पाच वर्षे कायम होती. मात्र ऐन निवडणुकीच्या काळामध्ये पवार यांनी या पक्षाच्या स्थानिक नेत्यांची बैठक घेऊन त्यांची नाराजी दूर करण्यात यश मिळवले. त्यामुळे शिवसेना ठाकरे यांचे शिवसैनिक पवार यांच्याबरोबर राहिले. यामुळे रोहित पवार यांच्या विजयाचा मार्ग प्रशस्त बनला.