कर्जत/जामखेड |तालुका प्रतिनिधी| Karjat|Jamkhed
मागील विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे जिल्ह्यामध्ये वर्चस्व होते. मात्र, या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी जिल्ह्यामधून हद्दपार होण्याचा मार्गावर असतांना रोहित पवार यांच्या काठावरील विजयामुळे शरद पवार गटाला खाते उघडता आले. कर्जत-जामखेड विधानसभा मतदासंघात आ. रोहित पवार आणि आ. राम शिंदे यांच्यात अटीतटीची लढत झाली. शेवटच्या फेरीत आ. पवार यांनी 1 हजार 243 मतांनी विजय मिळवला. यात आ. पवार यांना 1 लाख 27 हजार 676 तर आ. शिंदे यांना 1 लाख 26 हजार 433 मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी रात्री सव्वासात वाजता निकाल जाहीर केला.
कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघाकडे राज्यातील सर्वात लक्ष वेधले होते. याठिकाणी कोण बाजी मारणार याबाबत शेवटच्या फेरीपर्यंत उत्सुकता होती. प्रत्येक फेरीत चित्र बदलत होते. सुरुवातीला पहिल्या फेरीत पवार आघाडीवर होते. त्यानंतर शिंदे यांनी मुसंडी मारत आघाडी घेतली.पुढील काही फेर्यांत पुन्हा पवार यांनी आघाडी घेतली. त्यानंतर पुन्हा शिंदे यांनी आघाडी घेतली आणि शेवटच्या 26 व्या फेरीमध्ये रोहित पवार यांनी बाजी मारली. शेवटच्या बॉलवर सिक्सर मारून मॅच जिंकली असा हा निकाल लागला आहे. विधानसभा निवडणुकीची मतमोजणी कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालय येथील हॉलमध्ये झाली. मतमोजणीसाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतमोजणी परिसरात असणारा कर्जत वालवडरोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
मतमोजणी पहिल्या फेरीत रोहित पवार यांनी 288 मतांची आघाडी घेतली. मात्र दुसर्याच फेरीत शिंदे यांनी 634 मतांची आघाडी घेतली ही आघाडी तिसर्या फेरीत 1546 अशी वाढली आणि सहा फेर्यांपर्यंत शिंदे आघाडीवर होते. जेव्हा जामखेड तालुक्याची मतमोजणी सातव्या फेरीमध्ये सुरू झाली, त्यावेळी शिंदे यांची आघाडी तोडून 638 मतांची पवारांना आघाडी मिळाली. त्यांची ही आघाडी तेराव्या फेरीपर्यंत होती. मात्र चौदाव्या फेरीमध्ये पुन्हा कर्जत तालुका सुरू झाला आणि शिंदे यांनी पवार यांची आघाडी मोडून 184 मतांची आघाडी घेतली. यानंतर 19 व्या फेरीपर्यंत शिंदे आघाडीवर होते. विसाव्या फेरीमध्ये पवार यांनी शिंदे यांची आघाडी तोडून 285 मतांची राशीन जिल्हा परिषद गटामध्ये घेतली. 22 व्या फेरीत शिंदे यांनी पुन्हा आघाडी घेतली. त्यांनी ती 25 व्या फेरीपर्यंत टिकवली. मात्र, शेवटच्या 26 व्या फेरीमध्ये पवार यांनी आघाडी घेत विजय मिळवला. मतमोजणीचा निकाल जाहीर झाला आणि रोहित पवार यांच्या विजयाची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी केल्यानंतर राम शिंदे यांनी फेर मतमोजणीची मागणी केली.
मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ती नाकारली. अशाप्रकारे क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणार्या कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक प्रथमच अशा पद्धतीने ऐतिहासिक आणि चुरशीची झाली. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसघांच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये एवढ्या कमी मताच्या फरकाने निवडणूक जिंकण्याची ही पहिलीच घटना आहे. यावेळी प्रत्येक मताला किती महत्त्व आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. ज्या गावामध्ये आपल्या नेत्याला लीड मिळाले आहे, ते कार्यकर्ते उत्साहाने मिरवताना दिसून येत होते. मात्र, जसजसी मतमोजणी पुढे पुढे जात होती, तसा कोणालाही कोणताच अंदाज येत नव्हता. दोघांचेही समर्थक जल्लोष करत होते. अनेकवेळा कोण विजयी झालेले आहे हे देखील लक्षात येत नव्हते. शेवटच्या फेरीपर्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत पवार यांनी शिंदे यांच्यावर मात केली. राज्यात ही निवडणूक आगळीवेगळी ठरली.