कर्जत । प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २२७ कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ हाती घेण्यात आला आहे. या मोहिमेत मतदार यादीतील त्रुटी दूर करून ती अधिक पारदर्शक करण्यासाठी ३९,८७८ दुबार, मृत व स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत, अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नितीन पाटील यांनी दिली. मतदारसंघाची अधिकृत प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून ती नागरिकांसाठी ahilyanagar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या विशेष मोहिमेमुळे मतदारसंघातील मतदारांचा अचूक डेटा समोर आला आहे. सध्या कर्जत-जामखेड मतदारसंघात एकूण ३,५०,५२४ मतदार असून, पडताळणी दरम्यान २९,२१६ मतदारांच्या नावांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत. ज्या नागरिकांचे वय १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत १८ वर्षे पूर्ण होत आहे, त्यांना मतदार यादीत नाव नोंदवण्याची ही सुवर्णसंधी आहे. या संदर्भातील सर्व हरकती व दावे स्वीकारण्यासाठी ३० सितंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. नागरिकांनी आपले अर्ज (फॉर्म ६, ७ आणि ८) संबंधित मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) किंवा तहसील कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
“लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. ही मतदार यादी पूर्णपणे पारदर्शक आणि अचूक करण्यासाठी आम्ही दुबार व मृत नावे वगळली आहेत. नागरिकांनी स्वतः आपले नाव यादीत तपासावे आणि कोणतीही दुरुस्ती किंवा नवीन नोंदणी असल्यास ३० सप्टेंबरपूर्वी अर्ज सादर करून सहकार्य करावे.”
-नितीन पाटील (उपविभागीय अधिकारी, कर्जत उपविभाग)
३९,८७८ नावे वगळली: मतदार यादी शुद्धीकरणाच्या व्यापक मोहिमेत तब्बल ३९ हजार ८७८ मृत, दुबार आणि स्थलांतरित मतदारांची नावे कायदेशीर प्रक्रियेद्वारे यादीतून हटवण्यात आली आहेत.
१८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांना संधी: ज्या तरुणांचे वय १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण होत आहे, त्यांना नवीन मतदार नोंदणीसाठी (फॉर्म ६) ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येईल.
BLO कडे अर्ज करण्याची सुविधा: मतदार यादीत नाव समाविष्ट करणे किंवा आक्षेप घेण्यासाठी नागरिकांना कार्यालयात न जाता थेट त्यांच्या भागातील मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे (BLO) अर्ज सुपूर्द करता येणार आहे.




