कर्जत |प्रतिनिधी| Karjat
कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये आज माझाा राजकीय दौरा नाही. मात्र, भविष्यात येथील मतदरांनी बोलावल्यास मी पुन्हा येईल असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र जय पवार यांनी रविवारी कर्जतमध्ये पत्रकारांशी बोलतांना केले. यामुळे भविष्यात कर्जत-जामखेडमध्ये शरद पवार गटाचे विद्यमान आ. रोहित पवार आणि अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्यात सामना रंगणार का? याविषयी चर्चा सुरू झाली आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये रविवारी जय पवार यांनी महायुतीतील कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. यामुळे आता आ. रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये जय पवार विधानसभेची चाचपणी करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
यामुळे कर्जत- जामखेडमधील राजकीय सस्पेंन्स वाढला आहे. रविवारी जय पवार यांनी सर्वप्रथम राशीन जगदंबा देवीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतले. यानंतर कर्जत येथे संत गोदड महाराज यांचे जन्मस्थळ व समाधी मंदिर या दोन्ही ठिकाणी दर्शन घेतले. या सर्व ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रवीण घुले, राजेंद्र गुंड, पप्पू धुमाळ, अक्षय शिंदे, अशोक जायभाय, दीपक जंजिरे, ओंकार तोटे, आबासाहेब डांबरे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. या दौर्यामध्ये जय पवार यांनी घुले पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, अशोक खेडकर, तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ओंकार गुंड यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधाला.
बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये पवार कुटुंबामध्ये संघर्ष सुरू झाला. आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील पवार कुटुंबीयांमध्ये बारामती व कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये संघर्ष होणार असे चित्र दिसत येत आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार हे निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावर जय पवार यांना बारामतीमधून उमेदवारी द्यावी, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली होती. त्यावर अजित पवार यांनी यावर पक्ष कोअरकमिटी याबाबत निर्णय घेईल असे जाहीर केले होते.
दरम्यान आ. रोहित पवार यांच्या विरोधात अजित पवार निवडणूक लढवावी, असा दबाब गुजराथ आणि दिल्लीतून सुरू आहे. यामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होणार असे चित्र निर्माण असताना जय पवार यांचा कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये दौरा आयोजित केला. तसेच देवदर्शनाचे निमित्त करत त्यांनी तालुक्यातील प्रमुख पदाधिकार्यांशी संवाद साधल्याने विधानसभा निवडणुकीच्या तर्क विर्तकांना उत आला आहे. यावेळी जय पवार यांना माध्यम प्रतिनिधींनी छेडले असता आज माझा राजकीय दौरा नाही. मात्र, नागरिकांनी जर मला परत बोलावले तर नक्कीच मी परत येईल, असे सांगितले.
माझ्या विरोधात कोणीही उभा राहा. मी भल्याभल्यांना अंगावर घेण्यास तयार आहे. कर्जतमध्ये रविवारी नितेश राणे आले होते. यामुळे मला शंका आहे की जय पवार व नितेश राणे यांचे काही बोलणे झाले आहे का? कारण दोघेही एकाच दिवशी कर्जत दौर्यावर येणे हा योगायोग नसू शकतो.
– आ. रोहित पवार, कर्जत-जामखेड