गणेश जेवरे|कर्जत|Karjat
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ हा राज्यामध्ये लक्षवेधी मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. 2019 च्या निवडणुकीप्रमाणेच यावेळी देखील विद्यमान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आ. रोहित पवार व विधानपरिषदेचे आ. राम शिंदे यांच्यामध्येच प्रमुख लढत होत आहेत. मागील वेळी प्रमाणेच यावेळी देखील या निवडणुकीमध्ये मोठी चुरस मतदारसंघामध्ये पाहावयास मिळत आहे.
कर्जत व जामखेड अशा दोन तालुक्यांचा मिळून हा एकत्रित मतदार संघ आहे. या दोन्ही तालुक्यांची राजकीय व भौगोलिक परिस्थिती पूर्णपणे वेगळी आणि भिन्न आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघ हा तसा भाजपचा बालेकिल्ला आहे. सलग पंचवीस वर्षे या मतदारसंघांमध्ये भाजपचा आमदार निवडून आलेला आहे. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये आ. पवार यांनी शिंदे यांचा पराभव केला होता. यानंतर त्यांना भाजपने शिंदे यांना विधान परिषदेला संधी दिली. एवढेच नव्हे तर राज्यामध्ये महायुतीचे सरकार सत्तेवर आले. यामुळे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील चित्र पुन्हा बदलले. सुरुवातीला अडीच वर्ष भाजपमध्ये कोणी शिल्लक राहणार की नाही अशी परिस्थिती आ. पवार यांनी निर्माण केली होती. मात्र, पुन्हा आमदार झाल्यानंतर आणि राज्यात सत्ता आल्यामुळे शिंदे यांना बळ मिळाले आणि त्याचा वापर करत पुन्हा एकदा मतदारसंघात नाराज सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना एकत्र करत आ. पवार यांना आव्हान दिले आहे.
या निवडणुकीमध्ये एमआयडीसी हा प्रश्न निर्णायक ठरणार आहे. आ. पवार यांनी पाटेगाव खंडाळा येथे एमआयडीसी मंजूर करून आणली होती. मात्र, राज्यातील सत्ता बदल होताच शिंदे यांनी खांडवी कोंबडी परिसरात दुसरी एमआयडीसी मंजूर केली व पहिली एमआयडीसीला राज्य सरकारची मान्यता मिळू दिली नाही. यामुळे कोणती एमआयडीसी पूर्ण होणार, युवकांना रोजगार कोठे मिळणार त्यामुळे हा मुद्दा कळीचा ठरणार आहे. आ. पवार यांनी अडीच वर्षांमध्ये सर्वात जास्त निधी मिळवला आणि त्या माध्यमातून केलेल्या विकास कामाच्या मुद्द्यावर ते सातत्याने याठिकाणी भर देत आहेत. अपूर्ण पाणी योजना, कुकडीचे पाणी या प्रश्नावर शिंदे लक्ष वेधत आहेत.
जातीय समीकरण महत्त्वाचे
कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये मराठा मतदार सर्वात जास्त असले तरी ओबीसींमध्ये माळी व धनगर या समाजाचे मतदान लक्षणीय आहे. त्या खालोखाल मुस्लिम व मागासवर्गीय यांचे मतदान आहे. यामुळे मराठा, मुस्लिम व मागासवर्गीय हे तीन जाती लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करताना दिसून आले. आता विधानसभा निवडणुकीत शिंदे यावर काय मात्रा शोधतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आ. रोहित पवार आता राज्याचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे मतदारसंघासोबतच ते राज्यातील इतर भागांमध्ये जाऊनही प्रचार सभा घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर आ. पवार यांच्यावर राज्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे आ.शिंदे हे राज्याचे माजी मंत्री असून ते मात्र मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीनंतर तळ ठोकून थांबलेले आपल्याला पहावयास मिळत आहे.