Tuesday, April 22, 2025
HomeनगरKarjat : अविश्वास ठरावाआधीच कर्जत नगराध्यक्षांचा नाट्यमय राजीनामा

Karjat : अविश्वास ठरावाआधीच कर्जत नगराध्यक्षांचा नाट्यमय राजीनामा

नवीन नगराध्यक्ष निवडीकडे लक्ष || गटनेतेपदावरून संभ्रम

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

येथील नगराध्यक्ष उषा राऊत यांच्याविरोधातील अविश्वास ठरावावर नगरपंचायतीच्या सभागृहात सोमवारी (दि. 21) सकाळी 11 वाजता विशेष सभा बोलवण्यात आली होती. मात्र, अनेक नाट्यमय घडामोडीनंतर नगराध्यक्ष राऊत यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे राजीनामा दिला. सकाळी 10:30 वाजता राजीनामा दिल्यामुळे सभा रद्द करण्यात आल्याची माहिती पीठासन अधिकारी नितीन पाटील यांनी दिली. दरम्यान, विशेष सभेसाठी आलेले 13 नगरसेवक पुन्हा एकदा सहलीला गेले आहेत. नवीन नगराध्यक्ष कोण होणार? याकडे मतदारसंघासह राज्याचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

13 नगरसेवक एका खासगी वाहनाने पोलीस बंदोबस्तामध्ये नगरपंचायत कार्यालयाच्या परिसरामध्ये आले. त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. सभागृहामध्ये पीठासीन अधिकारी पाटील यांनी सभेचे कामकाज सुरू करतानाच जिल्हाधिकारी यांनी मेलवर पाठवलेले पत्र सर्व 13 नगरसेवकांना वाचून दाखवले. यामध्ये नगराध्यक्ष राऊत यांनी माझे समक्ष आज सकाळी 10:30 वाजता अध्यक्ष पदाचा राजीनामा सादर केलेला आहे व तो राजीनामा अमलात आलेला आहे. यामुळे अविश्वास प्रस्तावावर आता मतदान घेण्याची किंवा इतर कोणतीही चर्चा करण्याची आवश्यकता नाही असे उपस्थित नगरसेवकांना सांगितले.

दरम्यान, कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये आ. रोहित पवार यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा एक हाती पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाची तब्बल 15 नगरसेवक विजयी केले होते. भाजपला अवघ्या दोन जागा मिळाल्या होत्या. यानंतर पवार यांनी राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) उषा राऊत यांची नगराध्यक्षपदी, काँग्रेसच्या रोहिणी घुले यांची उपनगराध्यक्षपदी निवड केली. उषा राऊत यांना अडीच वर्ष नगराध्यक्षपद व रोहिणी घुले यांना दीड वर्ष उपनगराध्यक्षपद असे समीकरण ठरले होते. अडीच वर्षाची मुदत संपल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले आणि महायुती सरकारने राज्यातील सर्व नगरपंचायत व नगरपालिकांमध्ये विद्यमान नगराध्यक्षांना मुदतवाढ जाहीर केली. त्यानंतर उपनगराध्यक्ष घुले यांनी राजीनामा दिला नाही.

मात्र, राऊत यांनी दोन्ही पदांचे राजीनामे एकत्रित घ्या अशी मागणी केली. मात्र, ती नगरसेवकांना योग्य वाटली नाही त्यामुळे 13 नगरसेवक 6 एप्रिलला सहलीला निघून गेले. 7 एप्रिलला त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे राऊत यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. 16 एप्रिलला या अविश्वास प्रस्तावावर प्रांताधिकार्‍यांनी सुनावणी ठेवली होती. मात्र ती रद्द करण्यात आली. त्याचदिवशी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगरसेवकांमध्ये बहुमत असल्यास तेच नगराध्यक्षांना पदावरून दूर करू शकतात असा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे त्याचदिवशी राज्यपालांच्या सहीचा अध्यादेशही राज्यामध्ये लागू करण्यात आला.

या राजकीय नाट्यानंतर सोमवारी होणार्‍या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते, परंतू राऊत यांनी राजीनामा दिल्यानंतर सभा रद्द झाल्याने आता नवीन नगराध्यक्ष कोण होणार? याकडे मतदारसंघासह राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेतेपदी संतोष मेहत्रे व अमृत काळदाते, तर उपगटनेतेपदी सतीश पाटील आणि प्रतिभा भैलूमे या सर्वांनी दावा केला असून अधिकृत गटनेते कोण? असा प्रश्न कायम आहे. यामुळे कोणाचा व्हिप अधिकृत मानला जाणार याविषयी चर्चा सुरू आहे. मेहत्रे म्हणाले, अद्यापही कोण नगराध्यक्ष होणार हे ठरलेले नाही. राम शिंदे याबाबत निर्णय घेणार आहेत. फुटलेले नगरसेवक भाजप सोबत जाणार का? अशी विचारणा केली असता मेहेत्रे म्हणाले, कर्जत शहरातील जनतेचा विचार करून निर्णय घेण्यात येईल. उपनगराध्यक्ष रोहिणी घुले या दोन दिवसांत राजीनामा देतील असेही ते म्हणाले.

सभापती शिंदेंकडून सत्तेचा गैरवापर
माझ्या विरोधात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी पैसा व सत्तेचा गैरवापर केला. मी एक ओबीसी नगराध्यक्ष असताना देखील मला पदावरून काढण्यासाठी राम शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संपूर्ण राज्यासाठी नवीन कायदा केला आणि एका ओबीसी नगराध्यक्षांचा राजकीय बळी घेतला आहे, अशी टीका नगराध्यक्ष उषा राऊत यांनी केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

AMC : मनपात 45 तांत्रिक पदे भरण्याचा निर्णय

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महानगरपालिकेतील तांत्रिक पदांच्या भरतीची प्रक्रिया मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. आर्थिक अडचणींमुळे प्रशासनाने 130 पदांना कात्री लावत केवळ 45 तांत्रिक पदे भरण्याचा निर्णय...