Saturday, May 25, 2024
Homeनगरकर्जत एमआयडीसी मुद्दा पेटला, आज विविध ठिकाणी रास्तारोको

कर्जत एमआयडीसी मुद्दा पेटला, आज विविध ठिकाणी रास्तारोको

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

आ. रोहित पवार यांचा वेळोवेळी पाठपुरावा, मंत्रालयात केलेल आंदोलन यानंतर उद्योगमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही एमआयडीसीबाबत बैठक न झाल्याने कर्जत-जामखेडकर येथील संतप्त नागरिक व युवकांनी मतदारसंघातील विविध ठिकाणी गुरूवारी (दि.27) रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.

- Advertisement -

मतदारसंघातील कर्जतच्या छत्रपती चौक, राशीनच्या करमाळा चौक, माही जळगाव, मिरजगावच्या क्रांती चौक, जामखेड येथे खर्डा चौक अशा विविध ठिकाणी गुरुवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघातील पाटेगाव-खंडाळा येथील सर्व प्रक्रिया पूर्ण झालेल्या आणि केवळ सरकारच्या अंतिम मंजुरीच्या प्रतिक्षेत असलेल्या एमआयडीसी बाबतचा मुद्दा सध्या चांगलाच पेटला आहे. आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी उद्योग मंत्र्यांच्या भेटी घेऊन हा विषय मार्गी लावण्याबाबत विनंती केली व अंतिम मंजुरी मिळावी यासाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला. विधिमंडळ अधिवेशनात वेळोवेळी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतरही सरकारकडून केवळ मंजुरीचे आश्वासन मिळत असल्याने व कोणताही ठोस निर्णय घेतला जात नसल्याने अखेर आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळ परिसरात भर पावसात आंदोलन केले.

दरम्यान, आंदोलनाला बसलेल्या आमदार रोहित पवार यांची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट घेऊन तात्काळ स्वरूपात उद्याच्या उद्या बैठक लावून याबाबत चर्चा केली जाईल, असे आश्वासन दिले व आपल्या आंदोलन मागे घेण्याची विनंती आमदार रोहित पवार यांना केली. आमदार रोहित पवार यांनीही मंत्री महोदयांच्या विनंतीला मान देऊन तात्काळ आंदोलन स्थगित केले. परंतु दुसर्‍या दिवशी आमदार रोहित पवार यांच्यासह अधिकारी या बैठकीच्या प्रतिक्षेत तब्बल साडेचार तास मंत्री महोदयांची वाट पाहत होते. परंतु उद्योग मंत्री उदय सामंत हे बैठकीला उपस्थित राहिले नाही. यावरून सरकार पुन्हा एकदा कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीच्या निर्णयाबाबत उदासीन असल्याचे दिसून येत असल्याचे सांगत युवकांनी अंदोलन छेडले आहे.

श्रेयासाठी प्रतिष्ठा पणाला

कर्जत एमआयडीसीसाठी रोहित पवार यांनी पाठपुरावा केला तसेच अंतिम मंजुरीसाठी विधाभवनात अंदोलनही केले. परंतु आपणच एमआयडीसी आणणार असा छातीठोक दावा आ. राम शिंदे करत आहेत. एमआयडीसीचे श्रेय आपल्यालाच मिळावे यासाठी दोन्ही नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याची जिल्हाभरात चर्चा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या