Tuesday, November 26, 2024
Homeब्लॉगकर्मयोगिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी

कर्मयोगिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी

भारताच्या इतिहासात अनेक कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या. त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली. या सदरातून ओळख करून घेऊया भारतवर्षातील अशाच काही देदीप्यमान शलाकांची

भारत वर्षात अनेक स्रीरत्नांनी जन्म घेतला. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे भारतवर्षाचा गौरव वाढवला. भारतीय संस्कृतीला प्रकाशमान करण्यात या देदीप्यमान शलाकांचा मोठा वाटा राहिला आहे. या स्रीरत्नांपैकी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा कर्मयोग जाज्वल्य होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी म्हणजे साक्षात कर्मयोगिनी!

तत्कालीन कविवर्य मोरोपंतांना अहिल्याबाईंचा कर्मयोग उमजला होता. धर्मशाळा, विहिरी, देवालय हे काही त्यांनी परलोकीच्या सौख्यासाठी, स्वार्थापोटी केलेला धर्म नव्हे तर त्यात चिरंतन संस्कृतीचा, मानवतेचा, सामाजिक दृष्टिकोनाचा आदर्श आहे. यामुळे त्यांचे मन अभिमानाने भरून आले. अहिल्यादेवींच्या पायी माथा ठेवून ते म्हणाले,

- Advertisement -

श्रीहरिहरभक्ता तू देवि अहल्ये, वरा धरा भूषा।पूषा तुज साधु म्हणे ख्याता तुजसम न बाणतभूषा ॥देवी अहिल्याबाई झालीस, जगत्रयात तू धन्या।न न्याय धर्मनिरता अन्या कलिमाजी ऐकिली कन्या॥ अशा कर्मयोगिनीची कथा..

‘जे प्रयत्न घडवावे ते आणप्राण रक्षण करावे ऐसे थोर जन सांगतात. आम्ही तेच केले. जिवेभावे या पिंडीचे रक्षण!’ चौंडी गावात छोट्या अहिल्येचे शिवलिंग रक्षणासाठीचे धीटाईचे हे बोल मल्हारराव होळकरांना प्रभावित करून गेले. त्यांनी तिला आपली सून करून घेतले. तोपर्यंत परकराला काचा मारून ठिकरी खेळणारी अहिल्या एकदम राजवाड्यात येऊन दाखल झाली. मल्हारराव होळकरांचा पुत्र खंडेराव यांच्यासोबत वयाच्या आठव्या वर्षी अहिल्याबाईंचा विवाह झाला. मल्हाररावांनी खंडेरावाबरोबर अहिल्याबाईंचे शिक्षण सुरू केले. खंडेरावाला शिक्षणात रस नव्हता की युद्धावर जाण्याची फारशी आवड नव्हती. अहिल्येस ते पुत्रवत मानत. अहिल्याबाईंची बालवयातील तीव्र बुद्धी, ज्ञानलालसा, हिशेबातील गती आणि गृहकृत्यदक्षतेचे मल्हाररावांबरोबर सर्वांना कौतुक वाटे.

मल्हारराव होळकरांनी तलवार गाजवून माळवा जिंकला. उत्तरेकडे त्यांनी शौर्याची शर्थ करून मराठ्यांचे राज्य वाढवले. अहिल्याबाईंचा शुभ पायगुण म्हणूनच की काय युद्धात त्यांना विजयश्रीने माळ घातली आणि पेशव्यांनी माळव्याची सुभेदारी बहाल केली. पेशव्यांकडून सुभेदारीचे कागद शिक्का मल्हाररावांनी सून अहिल्येला सोबत घेऊन स्वीकारला. लहान वयापासूनच सुभेदारीचे हिशेब लिहायचे, जमा खर्च दुतर्फेने पाहणे, खासगी आणि सरकारी बाजू नेमक्या मांडणे, एकूण वसुलीची व्यवस्था याबरोबरच शस्रात्रांचा साठा, विविध कारखाने यावरही अहिल्याबाई बारीक नजर ठेवून काम करत. पहाटेपासून तर रात्रीच्या प्रहरापर्यंत अहिल्याबाई शिक्षण घेत असत व कारभारात जातीने लक्ष घालत असत. अशी तैलबुद्धीची सून लाभल्यामुळे मल्हारावांची कूळपुत्र खंडेरावाच्या नाकर्तेपणाची बोच थोडी कमी झाली होती. खंडेरावाने सुभेदारीच्या कामात किंवा वडिलांबरोबर युद्धातही कधी साथ दिली नाही. अहिल्याबाईंना मालोजी व मुक्ता ही दोन अपत्ये झाली.त्या पतिव्रता आणि धर्माने वागणार्‍या होत्या. मल्हारराव उत्तरेकडे मोहिमेवर असताना सुभेदारीचा कारभार अहिल्याबाई समर्थपणे पाहत होत्या. त्या जेवढ्या मर्यादशील होत्या तेवढ्याच कर्तव्यकठोर होत्या. फडणीशीतले अधिकारी व इतर ज्येष्ठांना आज्ञा देताना त्यांना अवघड वाटे म्हणून त्या श्री शंकर आज्ञेवरून…असे लिहीत असत.

अहिल्याबाईंचे विचार प्रगल्भ, पुरोगामी, लोकहिताचे होते. त्यांच्या शब्दाला तेज होते. त्यांच्या न्यायदानावर सर्वांचा विश्वास होता. नातेवाईक संपत्ती हडप करण्यासाठी आणि हवे ते मूल दत्तक घेऊ देत नव्हते म्हणून न्याय मागण्यासाठी एक विधवा नातेवाईक त्यांच्याकडे रडत आली तेव्हा अहिल्याबाईंनी तिला सांगितले, हे रडणे थांबवा बाई. कच्चेपणा सोडा. कडकपणे परिस्थितीला तोंड द्यायला शिका. तिला आधार देत महिलांनी निर्भयपणे राहायला हवे, असा त्यांनी उपदेश केला.

अहिल्याबाईंचे पती खंडेराव कुंभेरीच्या लढाईत मारले गेले. सासर्‍यांनी दौलतीसाठी, प्रजेसाठी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. रयतेसाठी त्या दुःख बाजूला ठेवून उभ्या राहिल्या. जो उपद्रव शौर्याने मोडून काढेल त्याच्याशी आपली मुलगी मुक्ताबाई हिचा विवाह करून द्यायचा असा पण ठेवला. त्यानुसार मुक्ताचा विवाह शूरवीर यशवंत फणसे यांच्याशी करून देण्यात आला. त्यांच्या मते, लग्न घराण्याशी नव्हे तर ते शौर्याशी व्हावे, कारण जशी सूर्य-चंद्राला जात नसते तशी सद्गुणाला जात नसते. श्वशूर मल्हारराव उत्तरेत असताना अब्दालीने आणि यवनांनी धुमाकूळ घातला. जनता त्रस्त झाली.अहिल्याबाईंच्या कानावर अनेक बातम्या, निनावी पत्र येऊ लागली. या बातम्यांनी अहिल्याबाईंचे काळीज तुटत होते. मल्हाररावांनी नजीब उद्वौला यास पुत्र मानून जीवदान दिले पण त्याने उत्तरेकडील रयतेस वेठीस धरले, त्रस्त केले. यामुळे अहिल्याबाई दुःखी झाल्या. रयतेसाठी काही भक्कम व्यवस्था नाही म्हणून रयत अशी उघड्यावर पडली. ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी कारभार्‍यांना आज्ञा देऊन आसेतू हिमाचलपर्यंत ठिकठिकाणी स्वखर्चाने भक्कम मंदिरे बांधली, मंदिरांना भक्कम दरवाजे बांधून घेतले. धर्मशाळा उभारल्या जेणेकरून संकटसमयी रयतेला आश्रयास उपयोग होईल. पक्क्या सडका, विहिरी, तलाव बांधून घेतले. ठिकठिकाणी अन्नछत्र उघडले.

तलवारबाजी करणार्‍या आपल्या शश्वुरांचा, होळकरांचा जयजयकार व्हावा यासाठी त्या कायम प्रयत्नशील राहिल्या. मल्हाररावांच्या कारकीर्दीत राज्याचा बंदोबस्त चांगला होता. त्याचे पुष्कळसे श्रेय अहिल्याबाईंकडे जाते. पेशवे व मल्हारराव यांच्यातील वैमनस्य मिटवण्याचे कामही अहिल्याबाईंनी केले. मल्हारराव होळकरांच्या निधनानंतर त्यांच्या कुळातील तुकाराम होळकरांना सोबत घेऊन अहिल्याबाईंनी होळकरांची गादी न्यायाने, धर्माने चालवली. इंदोरच्या सत्तेसाठी प्रसंगी कारस्थानी करणार्‍या गंगाधर चंद्रचूड, चिंतो विठ्ठल यांना आणि अगदी रघुनाथरावांना कणखर शब्दात त्यांनी वठणीवर आणले.

सर्व जवळच्या आप्तस्वकियांच्या निधनाने इंदोरच्या महालात त्यांचे मन लागेना. तेव्हा त्यांनी माहेश्वरी येथे राजधानी हलवली. ब्रह्मपुरीची स्थापना, वस्त्रोद्योग, ग्रामपंचायतीची योजना असे अजोड कार्य त्यांनी केले. प्रजेला अभय दिले. खेमजी रघुजीसारख्या मुकादमास लाचखोरीबद्दल कामावरून काढून टाकत दंड देऊन प्रजेसमोर स्वच्छ कारभाराचा आदर्श निर्माण केला. आपल्या प्रजेवर त्यांनी आपत्यवत प्रेम केले. अहिल्यादेवी सावळ्या रंगाच्या, मध्यम बांध्याच्या होत्या. त्यांचे डोळे तेजस्वी होते. धार्मिक आणि सात्विक वृत्तीचे तेज त्यांच्या चेहर्‍यावरून झळकत असे. त्या कायम शुभ्र पोशाख परिधान करत आणि शुभ्र आसनावर बसत. त्यांच्या वाणीला धार होती.त्यांच्या न्यायदानाने दोन्ही पक्षाचे समाधान होत असे.त्या उपासतापास करत. सढळ हाताने दानधर्म करत. ठिकठिकाणी त्यांनी जी अन्नछत्रे उभारली ती अजूनही चालू आहेत. संस्थानात राहून सार्‍या हिंदुस्थानभर त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी व अन्नछत्र उभारण्याचे मोठे कार्य केले. हे पाहिल्यावर आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. त्या धार्मिक होत्या पण धर्मांध नव्हत्या. त्यांच्या बुद्धीचा आवाका मोठा होता, सामर्थ्य दांडगे होते. पेशवे माधवराव नारायण अखेरच्या दिवसात अहिल्यादेवींचे क्षेमकुशल विचारत म्हणाले, आमच्या राज्याचे पुण्यशील महाद्वार म्हणजे माहेश्वरी आहे. मर्‍हाठीयांचा घंटानाद अखंड घुमावा असा आशीर्वाद माता अहिल्यादेवी आपण द्यावा. जनकल्याणासाठी त्यांनी देह कारणी लावला. अहिल्याबाईंचे महान कतृर्र्त्व हे हिंदुस्थानातील इतिहासातील एक सोनेरी पान आहे. इतिहासकार जॉन माल्कम लिहितात, अहिल्याबाई एक असामान्य स्री आहे. दुराभिमानाचा त्यांना स्पर्श नाही. धर्मपरायण असलेली ही स्री कमालीची सहनशील आहे. त्यांचे मन रुढीप्रिय असले तरी रुढीचा उपयोग विवेकाने जनकल्याणासाठी करून घेण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या