Tuesday, January 6, 2026
Homeदेश विदेशधक्कदायक! प्रेमाचा करुण अंत, प्रेमविवाह केला म्हणून बापाकडून गर्भवती मुलीची हत्या

धक्कदायक! प्रेमाचा करुण अंत, प्रेमविवाह केला म्हणून बापाकडून गर्भवती मुलीची हत्या

हुबळी । Hubali

कर्नाटकातील हुबळी तालुक्यातील इनापूर गावातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून एका निर्दयी वडिलांनी आपल्या सात महिन्यांच्या गर्भवती मुलीची तिच्या सासरी जाऊन निर्घृण हत्या केली आहे. या प्राणघातक हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाला असून, तिच्या सासरच्या मंडळींवरही तलवारीने वार करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या वडिलांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, मान्या पाटील आणि विवेकानंद दोड्डामणी यांचा सात महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. विवेकानंद हे दलित समाजाचे असल्याने मान्या यांच्या घरच्यांचा या विवाहाला तीव्र विरोध होता. जातीच्या वर्चस्ववादामुळे मान्या यांच्या वडिलांनी हे लग्न स्वीकारले नव्हते. लग्नानंतर या जोडप्याने कायदेशीर नोंदणी करून संसार सुरू केला होता. कुटुंबाचा धोका ओळखून हे दांपत्य हावेरी जिल्ह्यात वास्तव्यास होते. पोलिसांनी पूर्वी दोन्ही कुटुंबांमध्ये तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता, तरीही मान्या आणि विवेकानंद यांना गावी येण्याची भीती वाटत होती.

YouTube video player

तथापि, ८ डिसेंबर रोजी हे दांपत्य इनापूर या आपल्या मूळ गावी परतले. मान्या त्यावेळी सहा महिन्यांची गर्भवती होती. ती गावी परतल्याचे समजताच तिचे वडील प्रकाशगौडा पाटील आणि त्यांच्या नातेवाईकांनी तिला संपवण्याचा क्रूर कट रचला. रविवारी संध्याकाळी त्यांनी हा कट अंमलात आणला. आरोपींनी सुरुवातीला विवेकानंद यांचे वडील सुभाष दोड्डामणी यांना ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विवेकानंदांना त्यांच्या वडिलांचा अपघात झाल्याची खोटी माहिती देऊन घराबाहेर बोलावून घेतले.

विवेकानंद घराबाहेर गेल्याची संधी साधून प्रकाशगौडा पाटील, त्यांचे नातेवाईक वीरंगौडा पाटील आणि मुलगा अरुण गौडा यांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी मान्या आणि तिची सासू रेणवा या दोघीच घरी होत्या. आरोपींनी धारदार तलवारीने मान्यावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात मान्याचा मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आणि तिचा जागीच मृत्यू झाला. आपल्या पोटात वाढणाऱ्या सात महिन्यांच्या बाळासह मान्याचा करुण अंत झाला. या हल्ल्यात तिची सासू रेणवा या देखील गंभीर जखमी झाल्या आहेत.

हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. जखमी झालेल्या सासूला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण इनापूर गावात प्रचंड दहशतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हुबळी पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी आणि मान्याचे वडील प्रकाशगौडा पाटील यांना ताब्यात घेतले आहे. मात्र, त्यांचे इतर साथीदार अद्याप फरार असून पोलीस पथके त्यांचा कसून शोध घेत आहेत. “ऑनर किलिंग” या कोनातून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. जातीपातीच्या भिंती तोडून संसार थाटणाऱ्या एका तरुण मुलीचा तिच्याच वडिलांकडून झालेला हा अंत समाजातील भीषण वास्तव समोर आणणारा ठरला आहे.

ताज्या बातम्या

रविंद्र

“माझ्या त्या वक्तव्याकडे…”; विलासरावांवरच्या ‘त्या’ वक्तव्यावर रविंद्र चव्हाणांची आज एका वाक्यात...

0
छ. संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagarमहाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, अशी भाषा करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना विलासरावांचा...