अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
कर्नाटकातून विक्रीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यात आणण्यात येणार्या अवैध सम्राट पानमसाला गुटख्याच्या वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. खर्डा ते जामखेड मार्गावरील जातेगाव फाटा येथे सापळा रचून आयशर टेम्पो पकडण्यात आला. या वाहनातून सम्राट पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि आयशर टेम्पोसह तब्बल 28 लाख 4 हजार 160 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी एका युवकाला ताब्यात घेण्यात आले असून, गुटखा कंपनीशी संबंधित दोघे जण पसार आहेत. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पथक तयार करून कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. 9 नोव्हेंबर रोजी हे पथक खर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना संशयित टेम्पो पकडला. यामध्ये सम्राट पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला.
पोलिसांनी साबीर कौसर शेख (वय 24, रा. धाराशिव) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी सम्राट पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि आयशर टेम्पो असा एकूण 28 लाख 4 हजार 160 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेला गुटखा सम्राट पानमसाला कंपनीचे मालक संतोष चंद्रप्पा आणि रवींद्र शरणप्पा (दोघे रा. कर्नाटक) यांच्या मालकीचा असून, त्यांनी तो विक्रीसाठी पाठविल्याचे ताब्यातील आरोपीने पोलिसांना सांगितले. हे दोघे सध्या पसार आहेत. तिघांविरूध्द खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार रोहित मिसाळ, निळकंठ कारखेले, अरूण गांगुर्डे, बिरप्पा करमल व दीपक जाधव यांनी केली.




