दिल्ली | Delhi
कुख्यात गँगस्टर लॉरेंस बिश्नोई सध्या गुजरातच्या साबरमती जेलमध्ये कैद असला तरी संपूर्ण देशभरातच त्याची प्रचंड चर्चा सुरू आहे. मोठे राजकारणी, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर तर त्याच्या नावाची चर्चा थांबतच नाहीये.
लॉरेंसच्या शूटर्सनीच सिद्दीकी यांची हत्या केल्याचे सांगत या एका सोशल मीडिया पोस्टमधून या हत्याकांडाची जबाबदारी स्वीकारण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर सगळीकडे सध्या लॉरेंसच्याच नावाची चर्चा होताना दिसत आहे.
याचदरम्यान आता इतरांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या लॉरेंस बिश्नोईलाच आता जीवे मारण्यासाठी बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. क्षत्रिय करणी सेनेने लॉरेंस बिश्नोईचा एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना एक कोटी ११ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. क्षत्रिय करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राज शेखावत यांनी एक व्हिडीओ प्रसारित करून ही घोषणा केली आहे.
राज शेखावत यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये बिश्नोईच्या डोक्यावर बक्षीस जाहीर करण्याचे कारण सांगितले. सुखदेव सिंह गोगामेडी यांचा खून केल्याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईच्या विरोधात करणी सेनेचा राग आहे. करणी सेनेचे प्रमुख असलेल्या सुखदेव सिंह गोगामेडी यांची ५ डिसेंबर २०२३ रोजी जयपूर येथे हत्या करण्यात आली होती. हत्येच्या काही तासांनंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.
बिश्नोई सध्या अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात गुजरातच्या साबरमती कारागृहात आहे. गेल्या एप्रिल महिन्यात सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर झालेला गोळीबार आणि यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची झालेली हत्या, या दोन्ही प्रकरणात त्याचेच नाव समोर आले आहे.