पुणे | Pune
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी अकरा हजार चाळीस मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना पराभव झाला आहे…
याआधी 1991 च्या कसब्यातील पोटनिवडणुकीमध्ये देखील भाजपचा पराभव झालेला होता. आजच्या निकालाने पुन्हा एकदा ३२ वर्षापूर्वीची पुनरावृत्ती झाल्याचे चित्र आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसने मोठी ताकद लावली होती. भाजपचे हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात काही दिवस मुक्काम ठोकला.
मंत्री गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांनी पुण्यात मेळावे घेत जोर लावला. भाजपची यंत्रणा कामाला लागल्याने ही निवडणूक चुरशीचीच होईल, असे दिसून येत होते.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
आज मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली. ही आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत टिकवून ठेवत 11 हजार 40 मतांनी विजय मिळवला.
2019 च्या निवडणुकीमध्ये या ठिकाणावरून मुक्ता टिळक यांना तब्बल 21000 मतांचे मताधिक्य मिळाले होते. पण हे मताधिक्य कमी करण्यात रवींद्र धंगेकर यांना यश आल्याचे आता या निकालावरून स्पष्ट झालेले आहे.
1991 ला झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये तेव्हाचे काँग्रेसचे उमेदवार वसंत उर्फ तात्या थोरात यांनी भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांचा जवळपास साडेपाच ते सहा हजार मतांनी पराभव केला होता. हीच पुनरावृत्ती या निवडणुकीमध्ये झाली असून काँग्रेसने भाजपच्या ताब्यातून तब्बल 32 वर्षानंतर कसबा मतदारसंघ काढून घेतलेला आहे.