Monday, October 14, 2024
Homeनगरकात्रड येथे सावकारांच्या जाचास कंटाळून युवकाची आत्महत्या

कात्रड येथे सावकारांच्या जाचास कंटाळून युवकाची आत्महत्या

उंबरे |तालुका प्रतिनिधी| Umbare

राहुरी तालुक्यातील कात्रड येथील प्रमोद उर्फ संदीप भाऊसाहेब तांबे या 32 वर्षीय युवकाने खाजगी सावकाराच्या व मध्यस्थीच्या जाचास कंटाळून रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. सकाळी सहा वाजता ही घटना घडली.

- Advertisement -

मयत प्रमोद तांबे यांचे भाऊ प्रदीप भाऊसाहेब तांबे यांनी दिलेली माहिती अशी, मयत प्रमोद तांबे याने खाजगी सावकाराकडून मध्यस्थी मार्फत काही पैसे घेतले होते. परंतु प्रमोदने स्वतःच्या जमिनीचा व्यवहार झाल्यानंतर सावकाराचा मध्यस्थी असणार्‍याकडे मुद्दल व व्याजासह सहा लाख रुपये दिले होते. परंतु मध्यस्थी इसमाने सावकाराकडे ही रक्कम पोहोच केली नसल्याने सावकार आणि मध्यस्ती पुन्हा डबल पैसे मागू लागले. प्रमोदने त्यांना सांगितलं मी पैसे दिले तरी पण तुम्ही मला पैसे का मागता? यामध्ये त्यांनी दादागिरीची भाषा वापरून भावाला शिवीगाळ करून दमदाटी केली.

गुरुवारी सकाळी ते व इतर तीन ते चार जण परत घरी आले होते. प्रमोद दूध घालण्यासाठी गावात गेला असल्याचे त्यांना आम्ही सांगितले. त्यानंतर त्यांनी गावात जाऊन प्रमोदला दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे आम्हाला समजले. त्या दिवशी प्रमोद हा दूध घालायला गेला पुन्हा तो घरी परत आलाच नाही. रविवारी सकाळी साडेपाचच्या दरम्यान मयत प्रमोद याने त्याच्या मोबाईलवरून भाऊ व बहीण यांना संदेश पाठवला की, ‘आपल्या महादेवाच्या मंदिराकडील मळ्यात मी जिवंत आहे की मेलेला आहे?’ हे पाहण्यासाठी या. हा संदेश पाहिल्यानंतर आम्ही त्या शेताकडे धाव घेतली. तोपर्यंत प्रमोद याने शेतात असणार्‍या चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली होती.

सदरील घटनेची माहिती वांबोरी व राहुरी पोलीस स्टेशनला दिली. प्रमोदच्या खिशातील चिठ्ठीमध्ये सावकार व मध्यस्थी यांचे नाव असून ज्यांच्याकडे मी सहा लाख रुपये दिले आहे, ते मला वेळोवेळी जीवे मारण्याची धमकी देत होते व माझ्या कुटुंबाला, भावालाही मारण्याची धमकी देत होते. या सावकाराच्या तावडीतून आमच्या कुटुंबाला वाचवा. मी या सावकारांमुळेच आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत लिहिले असल्याचे त्याच्या भावाने सांगितले.

सदरील सावकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी राहुरी पोलीस स्टेशनला मयताचा भाऊ प्रदीप व नातेवाईक गेले असता पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. उलट अरेरावीची भाषा वापरून दमदाटी केली असल्याचे प्रदीप यांनी सांगितले. पोलीस व प्रदीप आणि नातेवाईकांची शाब्दीक चकमक होऊन तुम्ही गुन्हा दाखल करणार नसाल तर मी आत्महत्या करील असा पवित्रा प्रदीप घेतला होता. तरीही पोलिसांनी राजकिय दबाव आल्याने गुन्हा दाखल करून घेतला नाही, असा आरोप प्रदीपने केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल न करता आम्हालाही कल्पना नसताना प्रमोदचे शवविच्छेदन करून आम्हाला कुठलीही कल्पना न देता परस्पर पंचनामा केल्याचे म्हटले आहे. तपास केल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करू, तुम्ही प्रमोदचा अंत्यविधी करून टाका असे पोलिसांनी सांगितले.

संतप्त नातेवाईकांनी गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे ठणकावलेे. परंतु पोलिसांनी त्यांची खाकी भाषा वापरत या मयताच्या कुटुंबाला धमकी दिल्यामुळे मृतदेह ताब्यात घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राहुरी तालुक्यातील खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून अनेकांनी आत्महत्येचा प्रयत्न व आत्महत्या केल्या आहेत. पोलिसांनी हा गुन्हा का दाखल करून घेतला नाही? याच्यामागे कोणाचा हात आहे का? या बाबत सध्या नागरिकांमध्ये चर्चा आहे. मयत प्रमोद याच्या पश्चात भाऊ, आई, पत्नी, तीन वर्षांचा मुलगा व एक वर्षाची मुलगी आहे. सावकारावर गुन्हा दाखल न झाल्यास सर्व कुटुंब नगर येथे पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन देणार असून गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही आत्महत्या करणार असल्याचे भाऊ प्रदीप तांबे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या