अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
कोण बनेगा करोडपतीमधुन बोलतोय, तुम्हाला 25 लाखांची लॉटरी लागली आहे, असे सांगुन ठकविणार्या संशयित आरोपीला सायबर पोलिसांनी कल्याण येथून ताब्यात घेत अटक केली आहे. फैसल इकबाल मेमन (रा. मेमन मंजिल वाली पीर रस्ता, कल्याण, ठाणे, मुंबई) असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत नारायण अरूने (रा. सर्जेपुरा, अहिल्यानगर) यांनी सायबर पोलीस ठाण्यात 1 ऑगस्ट 2022 रोजी फिर्याद दिली होती. व्हॉट्सअॅप कॉलवरून कॉल करून फिर्यादीचा विश्वास संपादन करून, कोण बनेगा करोडपतीमधून बोलतोय तुम्हाला 25 लाखाची लॉटरी लागली आहे, असे सांगितले.
तसेच वेगवेगळे प्रोसेसिंग फिच्या नावाखाली फोन पे अकांऊट ऑनलाईन पैसे पाठविण्यास सांगितले. फिर्यादीने 1 लाख 33 हजार 200 रुपये टाकले. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्याअनुषंगाने सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांना मिळालेल्या माहितीनुसार तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हा गुन्हा फैसल मेमन याने केला असल्याचे तपासात उघड झाले. त्यानुसार त्याच्या शोधासाठी पथके रवाना करून त्याला कल्याण येथून ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पोलीस अंमलदार अभिजीत अरकल, मल्लिकाअर्जुन बनकर, उमेश खेडकर, कारखेले, अरुण सांगळे, महिला अंमलदार सविता खताळ, दिपाली घोडके यांच्या पथकाने केली.
कोण बनेगा करोड पतीची लॉटरी लागली आहे, क्रेडिट कार्ड अॅक्टीव्हेशन करून देतो, ऑनलाईन केवायसी अपडेट करून देतो, पेट्रोल पंप एजन्सी देतो, ट्रेडिंग अॅप डाऊनलोड करून जास्त प्रमाणामध्ये परतावा देतो, असे वेगवेगळ्या आमिषाला नागरिकांनी बळी पडू नये, तसेच अनोळखी व्यक्तीशी आर्थिक व्यवहार करतांना काळजी घ्यावी, असे आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी केले आहे.