अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
केडगाव परिसरातील दीपनगर भागात महिलांना देहविक्रीसाठी जागा उपलब्ध करून देत ग्राहकांकडून पैसे घेतल्याच्या माहितीवरून कोतवाली पोलिसांनी दक्षिण कमांड लष्करी गुप्तचर विभागाच्या सहकार्याने संयुक्त कारवाई केली. शनिवारी (19 सप्टेंबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात दोन जणांसह एक पीडित महिला आढळून आली.
या प्रकरणी सईदा अफसर खान (वय 54, रा. झेंडा चौक, केडगाव) आणि छोटुराम नारायण रायजी (वय 70, रा. केडगाव) यांच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना दीपनगर, केडगाव परिसरात एका महिलेने काही महिलांना देहविक्री करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याची माहिती मिळाली होती. त्याचवेळी दक्षिण कमांड लष्करी गुप्तचर विभाग, अहिल्यानगर यांच्याकडूनही याच बाबीच्या अनुषंगाने माहितीवर काम सुरू होते. त्यानंतर कोतवाली पोलीस आणि दक्षिण कमांड लष्करी गुप्तचर विभागाने संयुक्तपणे कारवाई करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी दुपारी दीपनगर, केडगाव येथील संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. या कारवाईत सईदा खान आणि छोटुराम रायजी यांच्यासह एक पीडित महिला आढळून आली.
दरम्यान, पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत संबंधित पीडित महिला बांगलादेशी नागरिक असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तिच्याकडे चौकशी केली असता सातपुते डेअरी परिसरात राहणारा तिचा पती एम. डी. टुटुल मुल्ला (वय 37) याची माहिती समोर आली. तो बांगलादेश येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित महिलेची तसेच तिच्या पतीची माहिती तपासून पाहण्याचे काम सुरू आहे. दक्षिण कमांड लष्करी गुप्तचर विभागाच्या अधिकार्यांसह पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी केली जात असून, संबंधित व्यक्तींच्या वास्तव्याबाबत तसेच भारतातील त्यांच्या स्थितीबाबत आवश्यक ती माहिती तपासली जात आहे.
बांगलादेशींच्या बेकायदेशीर स्थलांतरावरही लक्ष
दक्षिण कमांड लष्करी गुप्तचर विभागाकडून त्यांच्या कार्यक्षेत्रातील बेकायदेशीर स्थलांतराच्या अनुषंगाने बांगलादेशी तसेच अन्य देशांतील नागरिकांच्या हालचालींबाबत माहिती संकलन व कारवाई केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वी जून 2025 मध्येही अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात अशाच प्रकारची कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.त्याचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.




