अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
केडगाव देवी परिसरात तीन ठिकाणी चोरट्यांनी घरात चोर्या करत सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम व इतर साहित्य चोरून नेले. 17 एप्रिल ते 19 एप्रिल दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमितनगर, एकता कॉलनी व धनश्री कॉलनी येथे या घटना घडल्या. संगीता आसाराम भताने (वय 40, रा. अमितनगर, केडगावदेवी) यांनी फिर्याद दिली आहे.
चोरट्यांनी अमितनगर येथे एका घरातून 10 ग्रॅम सोन्याचे दागिने, 65 ग्रॅमच्या चांदीच्या वस्तू, 5 हजारांची रोकड असा 29 हजारांचा ऐवज लंपास केला. त्यानंतर एकता कॉलनी येथे एका घरातून 140 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने चोरून नेले. तसेच, धनश्री कॉलनी येथील घरातून चांदीची मूर्ती, कॉइन, मलेशियन चलनी नोटा, स्मार्ट वॉच, दोन घड्याळ, साऊंड बार, साडेतीन हजार रुपये रोख असा 14 हजारांचा ऐवज लंपास केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, उपनिरीक्षक गणेश देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास हवालदार सोनवणे करत आहेत.