अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar
बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील 30 हजारांची रोकड व 14 हजारांचे दागिने असा 44 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. 17 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान केडगाव उपनगरातील भूषणनगरमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी सतीश दगडू वाघ (वय 42) यांनी सोमवारी दुपारी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी वाघ कुटुंबासह गुरूवारी (दि. 17) सकाळी सहाच्या सुमारास बाहेरगावी गेले होते. शनिवारी दुपारी त्यांच्या शेजारी राहणार्या महिलेने फिर्यादी यांना तुमच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला दिसत असून दरवाजा उघडा दिसत आहे, अशी माहिती दिली. त्यानंतर वाघ हे सोमवारी (दि.21) पहाटे घरी परतले असता त्यांना घरातील कपाटामध्ये ठेवलेली 30 हजारांची रोकड, चार हजार रुपये किंमतीचे सोन्याचे देवीची प्रतिमा असलेले दोन कॉईन, 10 हजार रुपये किंमतीचे तीन चांदीचे कॉईन व त्यांच्या लहान मुलीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या व बदाम असा ऐवज आढळून न आल्याने तो चोरीला गेल्याची त्यांची खात्री झाली. त्यानंतर त्यांनी सोमवारी दुपारी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.