दिल्ली । Delhi
अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यावर अमेरिकेच्या न्याय विभागाने भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. याप्रकरणी अदानींविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला. यात खुद्द गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी (Sagar Adani) यांच्यासह सात जणांचा सहभाग असल्याचा आरोप आहे.
त्यानंतर आता केनिया सरकारने अदाणी समूहाला दुसरा झटका दिला आहे. केनिया सरकारने अदाणींच्या प्रस्तावित विमानतळ विस्तार आणि ऊर्जा प्रकल्पांना रद्द केले आहे. या प्रकल्पांसाठी अदाणी समूहाने बोली लावली होती. ऊर्जा क्षेत्राशी निगडित प्रकल्पाची किंमत ७०० दशलक्ष डॉलर तर ऊर्जा प्रकल्पाची किंमत १.८ अब्ज डॉलर असल्याचे सांगितले जात आहे.
केनियातील मुख्य विमानतळचे अधिकार अदानी ग्रुपला मिळावेत यासाठी एक प्रस्ताव त्यांनी केनिया सरकारला दिला होता. मात्र, २१ नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्ष विल्यम रुटो यांनी हा प्रस्ताव रद्द केला. तसेच एक मोठा ऊर्जा प्रकल्प देखील रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत.
केनियाच्या ऊर्जा मंत्रालयासोबत अदानी ग्रुप ७०० दशलक्ष डॉलर्स (सुमारे ६,२१५ कोटी रुपये) च्या ऊर्जा प्रकल्पाचा करार करण्याची तयारी अदानी ग्रुपकडून सुरू होती. या डीलअंतर्गत अदानी ग्रुप केनियामध्ये पॉवर ट्रान्समिशन लाइन तयार करणार होता. परंतु, आता ही डील रद्द करण्याचे निर्देश दिले गेले आहेत.