Wednesday, July 24, 2024
Homeनगरखडकेवाके : केल्याने होत आहे रे , आधी केलेची पाहिजे

खडकेवाके : केल्याने होत आहे रे , आधी केलेची पाहिजे

राहाता (प्रतिनिधी) – ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’ या उक्तीप्रमाणे करोनासारख्या महामारीशी दोन हात करताना राहाता तालुक्यातील खडकेवाके या गावाने करोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना फलदायी ठरल्या आहेत. तालुक्यातील करोनामुक्त गाव म्हणून खडकेवाके गावाने राबवलेला पॅटर्न यशस्वी ठरला आहे.

- Advertisement -

खडकेवाके गावची लोकसंख्या तशी 3 हजार. गावातील बहुतांश कुटुंबे शेती व्यवसाय करतात. काळानारुप अनेक तरुण पुणे, मुंबई, नाशिक तसेच परदेशातही नोकरीसाठी गेले आहेत. करोना वणव्यात अनेक शहरं, गाव होरपळली असताना खडकेवाके गाव मात्र करोनामुक्त झाले आहे. राज्य सरकार, जिल्हा प्रशासन तसेच तालुका महसूल विभाग, आरोग्य विभाग आणि खास करून ग्रामपंचायतने गावात करोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्याने हे शक्य झालं आहे. करोनाच्या पहिल्या लाटेत 25 तर दुसर्‍या लाटेत 39 जण करोना बाधित झाले. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बाहेरून येणार्‍या व्यक्तीला संस्थात्मक विलगीकरण करणे, ग्रामस्थांची वेळोवेळी करोना टेस्ट करणे, जनजागृती करणे, करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेणे व कोणी जर करोना बाधित आढळले तर उपचारासाठी पाठवणे अशा विविध उपाययोजना ग्रामपंचायतीने राबवल्या. त्यामुळे आज गावात एकही करोनाबाधित रुग्ण सापडत नाही. विशेष म्हणजे करोना संसर्गामुळे एकही मृत्यू झालेला नाही.

जिल्ह्यात हिवरे बाजार नेहमीच आदर्श गाव ठरले आहे. देश पातळीवर हिवरे बाजार गावाने राबविलेल्या उपक्रमांचा गवगवा होत आहे. त्या पाठोपाठ खडकेवाके गावाने करोना संकटात केलेल्या उपाययोजना देखील आदर्शवत आहेत. गावात करोनाविषयी जनजागृती करणारे भिंतीवरील मार्मिक संदेश देखील बोलके असेच आहेत.

सरपंच सचिन मुरादे, उपसरपंच सुनीता अशोक लावरे, सर्व सदस्य, ग्रामसेवक जी.डी. ओहोळ, पोलिस पाटील रावसाहेब लावरे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश मुरादे , उपाध्यक्ष शरद लावरे, जालिंदर मुरादे, श्री. गुळवे, दीपक गायकवाड, श्रीमती भांड व आशा सेविका यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रमोद म्हस्के आदींनी कौतुक केले आहे.

राज्य शासनाने घालून दिलेल्या कोविड नियमांचे पालन करताना त्याची प्रामुख्याने अंमलबजावणी केली. करोना संकटात राजकारण न करता विरोधक आणि सत्ताधारी मंडळींनी एकदिलाने काम केले. ग्रामस्थांनी देखील साथ दिली. त्यामुळे गावाची वाटचाल करोना मुक्तीकडे झाली आहे.

सचिन मुरादे, सरपंच

- Advertisment -

ताज्या बातम्या