खडकेवाके |वार्ताहर| Khadakewake
राहता तालुक्यातील आदर्श ग्राम म्हणून ओळखल्या जाणार्या खडकेवाके येथे पिंपळस खडकेवाके शिव रस्त्यालगत यादव वस्तीवर दुपारच्या वेळेस दोन बिबटे व तीन बछड्यांचे दर्शन झाल्याने ग्रामस्थामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तात्काळ पिंजरा लावुन बिबट्या व त्याचे बछडे जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास प्रकाश लावरे व रावसाहेब यादव हे शिर्डी येथे कामावर जात असताना मोठेबाबा दिवस्थान जवळ त्यांना दोन बिबटे दिसले. त्यांनी आजूबाजूच्या शेतकर्यांना आरडाओरडा करून बोलावून त्यांना सावध राहा असे सांगितले. त्याच दिवशीं सायंकाळी पप्पू गाडेकर व ज्ञानेश्वर नळे यांना बिबटे व त्यांच्या पाठोपाठ तीन बछडे दिसले. या मुळे ग्रामस्थामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गत आठवड्यात पिंपळस येथील पुंड वस्तीवर सुद्धा काही ग्रामस्थांनी बिबट्या पहिला असल्याचे सांगितले आहे. बिबट्या हा पिंपळस येथील पुंड वस्ती, गायकवाड वस्ती, कुदळे वस्ती, वाघमारे वस्ती येथे वारंवार दिसत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. तरी या भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.