पंकज पाचपोळ
जळगाव – jalgaon
गेल्या काही दिवसांपासून आक्रमकपणे भाजपातील नेत्यावर व मुख्यत्वे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करणारे एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादि प्रवेशाबाबत स्वतः शरद पवार यांनी चाचपणी सुरू केली असून त्याबाबत बुधवारी मुंबई येथे आयोजित बैठकीत चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादी मधील काही खास सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान या विषयावर जळगाव जिल्ह्यातून बैठकीला गेलेल्या नेत्यांनी मात्र सिंचन प्रकरणावर चर्चा झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मात्र खडसे राष्ट्रवादीत आल्यानंतर जिल्ह्यातील राजकारणात होणारे बदल, राष्ट्रवादीची जिल्ह्यातील सद्यस्थिती व खडसे आल्यानंतरची परिस्थिती, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे अस्तित्व व खडसे आल्यानंतर होणारे संभाव्य बदल, संघटनात्मक दृष्ट्या भविष्यातील परिस्थिती, खडसेंनी आरोप केल्याप्रमाणे एका माजी मंत्र्याच्या पीए च्या अश्लील क्लिप आणि त्यामागील सत्य या सर्व विषयावर स्वतः शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत चर्चा झाली.
दरम्यान या बैठकीला जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, आमदार अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतीश पाटील, माजी आमदार दिलीप वाघ उपस्थित होते.
दरम्यान या बैठकीबाबत प्रसार माध्यमांशी बोलण्यासाठी फक्त जिल्हाध्यक्ष यांनाच परवानगी देण्यात आली असल्याचे आदेश खुद्द शरद पवार यांनीच या बैठकीत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे .खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत बैठकीला उपस्थित सर्वच पदाधिकाऱ्यानी हिरवा कंदील दिला असल्याची माहिती देखील मिळाली आहे.