Wednesday, December 4, 2024
Homeनगरखानापूर शिवारात दोन बिबट्यांमध्ये घमासान

खानापूर शिवारात दोन बिबट्यांमध्ये घमासान

माळवाडगाव |वार्ताहर| Malvadgav

श्रीरामपूर तालुक्यातील पूर्व भागात प्रवरा पाठोपाठ आता गोदाकाठ पट्ट्यातही बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढलेला असतानाच

- Advertisement -

दोन बिबट्यांनी घासाच्या पिकात डरकाळ्या फोडत एकमेकांवर हल्ला चढवला. त्यामुळे वस्तीवरील गाईगुरांसह माणसेही जागी झाली. नागरिकांची चाहुल लागताच एक बिबट्या उसात पळाला तर दुसरा जबर जखमी झालेला बिबट्या शेतकर्‍याच्या शेडमध्ये आश्रयास आला. ही घटना खानापूर शिवारातील हरिभाऊ भानुदास आदिक यांच्या वस्तीवर काल (शनिवार) पहाटेच्या सुमारास घडली.

आजपर्यंत बिबट्याने माणसे, शेळी, कुत्रे, जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना नेहमी ऐकण्यास मिळतात. परंतु आज बिबट्याने बिबट्यावरच हल्ला केल्याची घटना घडली. यामध्ये एका बिबट्याने दुसर्‍याच्या डोक्यावर पंजाचा जोरदार प्रहार केल्याने एक बिबट्या रक्तबंबाळ होऊन मेंदूला मार लागल्याने भोवळ येऊन जखमी झाला आहे.

या झुंजीच्या आवाजाने जागे झालेल्या नागरिकांच्या आरडाओरड झाल्याने एक शेजारच्या ऊसात पळाला तर दुसरा जखमी घराच्या बाजूने शेडच्या आश्रयास आला. शेडमध्ये स्थिरावलेल्या बिबट्याला पाहून हरिभाऊ यांनी तातडीने थोरले बंधू कचरूपाटील आदीक यांच्यासह पोलीस पाटील संजय आदीक, पत्रकार, अन्य तरूण कार्यकर्त्यांना फोन करून घटना सांगितल्याने तातडीने सर्वजण घटनास्थळी मदतीसाठी दाखल झाले.

यावेळी बिबट्याला बघण्यासाठी खानापूर गांवठाणच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सकाळी जसजशी वार्ता समजेल तसतसे जुन्या गावातील ग्रामस्थांसह भामाठाम, माळवाडगाव येथील नागरिकांनी देखील गर्दी केली होती. वस्तीलगत घासामध्ये तुंबळ हाणामारी झुंज झाल्याच्या खुणा आहेत.

त्यानंतर या घटनेची माहिती वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आली. सकाळी सदर बिबट्याला वनविभागाच्या अधिकार्‍यांच्या ताब्यात देण्यात आले. अहमदनगर उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, सहवनसंरक्षक देवखिळे, वनक्षेत्रपाल पोकळे, यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल बी.एस.गाढे, बी.बी.सुरासे, एस.एम. लांडे, वनमित्र शरद आसने यांनी जखमी बिबट्यास उपचारासाठी श्रीरामपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले.

उपचार करून सलाईन देण्यात आले. तब्येतीत सुधारणा जाणवत नसल्याने वरिष्ठांचे आदेशानुसार बिबट्याला नगर येथे सिटी स्कॅन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

खानापूर शिवारात नागरिकांना अनेकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने अन् आज पाहिलेला बिबट्या परिसरातच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच आता सुगीचे दिवस आहे. मात्र, बिबट्याच्या भीतीने शेतकरी एकटे शेतात जाण्यास धजावत नाही. शेतीचे रात्रीचे कामे ठप्प आहेत.

तातडीने पिंजरा लावणार – वनसंरक्षक

नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन वनपाल व वनरक्षकांशी चर्चा करून दुसरा बिबट्या जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली. उपवनसंरक्षक अहमदनगर यांच्याशीही त्यांनी संपर्क साधला. यावेळी घटनास्थळी तातडीने पिंजरा लावण्यात येणार असल्याचे आश्वासन नगराध्यक्षा आदिक यांना वन अधिकार्‍यांनी दिले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या