खंडाळा |वार्ताहर| Khandala
श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील खंडाळा येथे बुधवारी पहाटे एका तरुणाने आपल्या वडिलांची धारदार हत्याराने हत्या (Father Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे गावासह परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार आरोपी हा मनोरुग्ण (Psychopath) असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खंडाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ वास्तव्यास असलेले सचिन प्रभाकर ढोकचौळे (वय 55) हे बुधवारी सकाळी त्यांच्या घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती गावभर पसरताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सचिन ढोकचौळे यांचा मृतदेह (Dead Body) घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला, तर त्यांचा मुलगा प्रणव सचिन ढोकचौळे (वय 25) हा घटनास्थळीच उपस्थित होता. पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर प्रणव ढोकचौळे याने टिकावासारख्या जड आणि धारदार हत्याराने वडिलांच्या डोक्यावर वार करून त्यांची हत्या (Murder) केली. आरोपीने गुन्हा केल्यानंतर घटनास्थळ सोडून पळून जाण्याचा प्रयत्न न करता घरातच थांबून राहिल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत त्याने हत्येची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, आरोपी (Accused) प्रणव हा मानसिक आजाराने ग्रस्त असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती नातेवाईक व स्थानिकांकडून मिळत आहे. पोलिसांकडून याबाबत अधिक तपास करण्यात येत असून वैद्यकीय नोंदींचीही पडताळणी केली जात आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेले सचिन ढोकचौळे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या दुर्दैवी निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख तसेच फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून हत्येसाठी वापरण्यात आलेले हत्यार जप्त केले आहे. संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमागील नेमके कारण, कौटुंबिक वादाचे स्वरूप तसेच आरोपीच्या मानसिक स्थितीबाबत सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख पुढील तपास करीत आहेत.




