जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed
शहरात खर्डा पोलिसांनी (Kharda Police) शुक्रवारी (दि.15) मध्यरात्री छापा (Raid) टाकून तब्बल सहा लाख 34 हजार 146 रुपयांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त (Gutkha Seized) केला. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मालवाहू टेम्पोसह मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
जामखेड-मोरेवस्ती रोडलगत प्रोफेसर कॉलनी परिसरात दि. 15 मे रोजी रात्री सुमारे 10.25 वाजता ही कारवाई करण्यात आली. आरोपी बाळु ऊर्फ शिवदत्त नंदकुमार मोहिते (रा. बोराटे वस्ती, जामखेड) याच्या मालकीच्या महेंद्रा जितो मालवाहू बंद बॉडी टेम्पो (एमएच 12 एनएक्स 2183) मधून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पान मसाला व सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बाळु खाडे फिर्यादीवरुन जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान डायरेक्टर स्पेशल, विमल, सुपर साऊंड, सम्राट, एम. सिलेक्ट, एमएनडी तसेच प्रीमियम शॉट या विविध कंपन्यांचा पान मसाला व सुगंधी तंबाखूचा मोठा साठा जप्त (Aromatic Tobacco Seized) करण्यात आला. जप्त तंबाखूजन्य मालाची किंमत दोन लाख 59 हजार 146 रुपये असून मालवाहू टेम्पोची किंमत 3 लाख 75 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल बाळु खाडे, वैजिनाथ मिसाळ, धनराज बिराजदार आदींनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गावडे करीत आहेत.
जामखेड पोलीस स्टेशनच्या जवळच मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा आढळल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या कारवाईसाठी खर्डा पोलिसांना पुढाकार घ्यावा लागल्याने जामखेड स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जामखेड शहरात खुलेआम गुटखा विक्री व साठेबाजी सुरू असताना प्रभावी कारवाई का होत नाही, याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.




