अहिल्यानगर (प्रतिनिधी)
यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ७ लाख ७१ हजार हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांचे क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २० हजार हेक्टरने क्षेत्र वाढणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. यामध्ये मका, तूर, कापूस या पिकांचा समावेश आहे. मागील वर्षी सोयाबीन पिकाला भाव न मिळाल्याने यंदा सोयाबीनचे क्षेत्र घटणार असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, खरीप नियोजनासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी नगरला बैठक झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत पालकमंत्री यांनी कृषी विभागाला विविध सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी दिले. यंदा खरीप हंगामासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या क्षेत्रात तांदूळ २१ हजार, बाजरी ८५ हजार, मका ९१ हजार, तूर ७७ हजार, मूग ५१ हजार, उडीद ७१ हजार, भुईमूग ४ हजार, सोयाबीन १ लाख ९० हजार, ऊस २५ हजार तर कापूस १ लाख ५६ हजार हेक्टर असे नियोजन करण्यात आले आहे. गेल्यावर्षी खरीप हंगामात ७लाख ५१ हजार ५२८ हेक्टर क्षेत्रात विविध पिकांची पेरणी झाली होती. यंदा ती ७ लाख ७१ हजार हेक्टर म्हणजे २० हजार वाढणार आहे.
हंगामासाठी सार्वजनिक ३७ हजार ६१७ क्विंटल, खासगी ३९ हजार ६८८ क्विंटल असे एकूण ७७ हजार ३०५ क्विंटल बियाणे यांची मागणी करण्यात आली आहे. तसेच कापसाचे ५ लाख ७४ हजार ८१३ पाकिटांचे नियोजन करण्यात आले आहे. सुमारे १२ कापसाच्या बियाणांचे वाण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर १ लाख ३२ हजार ६२ मेट्रीक टन खत उपलब्ध आहे. या हंगामासाठी २ लाख १९ हजार २०७ मेट्रीक टन खतांची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यापैकी २ लाख २४ हजार १४६ मेट्रीक टन खत साठा मंजूर आहे. मागील शिल्लक १ लाख ८ हजार ९४५ मेट्रीक टन आहे. तसेच ७ हजार १०० मेट्रीक टन संरक्षित साठा करण्यात आला आहे.
१५ भरारी पथके
कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेची खातरजमा करण्यासाठी जिल्ह्यात १५ विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये एका तालुक्यातील पथक दुसऱ्या तालुक्यात तपासणी करणार आहे. यासोबतच १६ ठिकाणी तक्रार निवारण कक्ष उभारण्यात आले आहेत.