Friday, December 13, 2024
Homeनगरश्रीरामपूर तालुक्यात खरिपाचे 26 हजार 300 हेक्टर उद्दिष्ट

श्रीरामपूर तालुक्यात खरिपाचे 26 हजार 300 हेक्टर उद्दिष्ट

बळीराजाची खरिपाची तयारी अंतीम टप्प्यात, काही ठिकाणी कपाशी लागवडीला वेग

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

खरिपाचा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शेतकरी सज्ज झाला आहे. श्रीरामपूर तालुक्यात सध्या खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या कामास सुरुवात झाली आहे. नांगरणी, वखरणी, खत पसरविणे आदी कामांबरोबरच बी-बियाणे, खते खरेदीसाठी आर्थिक जुळवाजुळव शेतकर्‍यांकडून सुरू आहे. यासाठी कृषी विभागानेही तयारी पूर्ण केली असून यंदा 26 हजार 300 हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या खरिपाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. खरीप हंगामात शेतकर्‍यांना रासायनिक खतांची टंचाई भासू नये यासाठी 5 हजार 285 मेट्रिक टन खताचा साठा तालुक्यात उपलब्ध आहे.

- Advertisement -

या खरीप हंगामामध्ये सोयाबीन 16100 हेक्टर, मका 3650 हेक्टर, कपाशी 6230 हेक्टर, भुईमूग 120 हेक्टर, बाजरी 200 हेक्टर अशा पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. जून महिना सुरू होताच पाऊस झाल्याने राहिलेल्या मशागतीला वेग आला आहे. यंदाचा खरीप बळीराजासाठी चांगला जाईल अशी अपेक्षा आहे. मागील तीन वर्षांपासून शेतकरी राजा अस्मानी संकटाबरोबरच, शेती मालाला नसलेला भाव, खते, बी-बियाणांच्या वाढत्या किमती, मजूर टंचाई बरोबरच वाढलेले मजुरीचे दर अशा विविध संकटांचा सामना करत हवालदिल झाला आहे. बळीराजा पुन्हा स्वत:ला सावरून काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या खरीप हंगामाच्या तयारीस लागला आहे.

खरीप हंगामात पिकाच्या निकोप आणि उत्तमवाढीसाठी जमिनीची मशागत करण्यावर शेतकर्‍यांनी भर दिला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सोयाबिनचे क्षेत्र वाढणार आहे. सोयाबिनसाठी 16100 हेक्टर क्षेत्र गृहीत धरण्यात आले आहे. त्यापाठोपाठ कपाशी 6230 हेक्टर नंतर मका 3650 हेक्टर क्षेत्र गृहीत धरण्यात आले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत मक्याच्याही क्षेत्रात वाढ होताना दिसत आहे. बाजरी पीकही 200 हेक्टरवर घेतले जाणार आहे. यंदा खरीप हंगामात 5 हजार 285 मेट्रिक टन खताचा साठा आहे. शेतकर्‍यांनी कीड- रोगाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शेताची खोल नांगरट व बांध स्वच्छ करावेत. अधिकृत विक्रेत्यांकडूनच खते बियाणे खरेदी करून पक्की पावती घ्यावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्री. अविनाश चंदन यांनी केले आहे.

सोयाबिनला चांगला भाव मिळावा ही अपेक्षा
खरीप हंगाम सुरु होताच बळीराजा शेतीच्या मशागतीला लागतो. शेतीच्या नांगरणी, रोटा, बियाणे, खते आदींच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यात मजुराची टंचाई असल्याने मजुरीसाठीही मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो. त्यात पीक काढणीला आले की हवामानाचा लहरीपणा यामुळे बळीराजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यातच शासनाच्या दुटप्पी धोरणामुळे शेतमालाला कधीही चांगला भाव मिळत नाही. गेल्या तीन ते चार वर्षांपासून सोयाबिनला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यात खर्चही निघत नाही. त्यामुळे यंदाच्या खरिपातील सोयाबिनला चांगला दर मिळावा, अशी माफक अपेक्षा बळीराजा करत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या