अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात खरीप हंगाम 2025 साठी खतांचा साठा व बियाणे पुरवठा याबाबत काटेकोर नियोजन करा. पाऊस पडल्यावर शेतकर्यांना वेळेत चांगल्या दर्जाचे व योग्य किंमतीत बियाण्याचा पुरवठा व्हावा. तसेच बोगस खते, बियाणे व लिंकिंगबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास कठोर कारवाई करण्यात यावी, असे आदेश नूतन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आसिया यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी कृषी विभागाच्यावतीने शेतकर्यांसाठी राबवण्यात येणार्या योजनांचा जिल्हाधिकारी डॉ. आसिया यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी सुधाकर बोराळे, कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार आणि शिक्षण विभाग संचालक डॉ. जी. के. ससाणे, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी राज्य प्रतिनिधी विनायक राऊत, अतिरिक्त पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, महात्मा फुले कृषी विद्यापीठतील शास्त्रज्ञ डॉ. आनंद चवई यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जिल्हा अधिक्षक कृषी बोराळे यांनी कृषी विभाग अंतर्गत यावर्षी राबविलेल्या विविध योजनांचा भौतिक व आर्थिक लक्षांक व त्याप्रमाणे केलेले साध्य याचे सादरीकरण केले. यात जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती, सिंचन क्षेत्र, खरीप व रब्बी पीक पध्दती, फळबाग क्षेत्र, प्रक्रिया उद्योग, निर्यातक्षम बागांची नोंदणी, स्मार्ट अंतर्गत प्रकल्प याविषयी माहिती दिली. प्रधानमंत्री पीक विमा योजना व गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना 2024-25 अंतर्गत प्राप्त 85 प्रस्तावास जिल्हास्तरीय समितीने यावेळी मान्यता दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. आसिया यांनी खरीप हंगाम 2025 साठी खतांचा साठा व बियाणे पुरवठा याबाबत काटेकोर नियोजन करुन शेतकर्यांना वेळेत चांगल्या दर्जाचे व योग्य किंमतीत पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. तसेच जिल्ह्यात फळबाग लागवडीचे क्षेत्र वाढवण्यावर कृषी विभागाने भर देऊन प्रक्रिया उद्योगामध्ये सहभाग वाढवा. कृषी प्रक्रिया उद्योगांची यशोगाथा तयार करावी, याबाबत जिल्हाधिकारी डॉ. आसिया यांनी सूचना दिल्या.