अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
यंदा जिल्ह्यात धुव्वाधार सुरूवात केलेल्या पावसाने गेल्या दोन महिन्यांपासून दडी मारली आहे. यामुळे खरीप हंगामात 6 लाख 75 हजार हेक्टरवर पेरणी झालेल्या पिकांवर संकट ओढवलेले असून त्यांना पाण्याची नितांत निर्माण झाली आहे. तसेच ज्या ठिकाणी पाण्याची सोय असून पिके जोमात असतांना त्या ठिकाणी विविध पिकांवर कीड रोगाने हल्ला चढवला आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी असमानी संकटामुळे हबकल्याचे चित्र असून पाण्याअभावी अनेक ठिकाणी पिकांनी माना टाकण्यास सुरूवात केली आहे. यामुळे खरीप हंगामातील अनेक पिकांच्या उत्पादनात घट येणार असल्याचे प्राथमिक चित्र असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
यंदा जिल्ह्यात मे महिन्यांच्या शेवटच्या दोन ते तीन दिवसात अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर येवून तलाव भरले होते. यामुळे शेतकर्यांनी मोठ्या उत्साहात खरीप हंगामातील पिकांची पेरणी सुरू केली. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत खरीप हंगामाच्या 7 लाख 16 हजार हेक्टर नियोजनाच्या सरासरीच्या तुलनेत 94.2 टक्के म्हणजेच 6 लाख 74 हजार 694 हेक्टरवर पेरण्या झालेल्या आहेत.
मात्र, पेरणीनंतर जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून पाऊस गायब झाला आहे. सुरूवातीच्या दीड महिना केवळ वाहनारे आभाळ आणि सोसायट्याचा वारा होता. मात्र, गेल्या आठ ते दहा दिवसांपासून उन्हाचा कडका वाढण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे खरीप हंगामातील पिके तहानाली आहे. जुलै महिन्यांत जिल्ह्यात अनेक भागात भिज पाऊस ते भूरभूर स्वरूपात पाऊस झाला. यामुळे काही प्रमाणात पिकांना जीवदान मिळाले. मात्र, आता खरीप हंगामाची वाटचाल गंभीर स्थितीकडे वळातांना दिसत आहे. जून महिन्यात जिल्ह्यात केवळ आठ दिवस पाऊस झालेला असून त्या महिन्यांच्या सरासरीच्या 74 टक्के पाऊस झालेला आहे. तर जुलै महिन्यांत जिल्ह्यात केवळ 8 दिवस पाऊस झालेला असून त्याची सरासरी ही केवळ 62 टक्के आहे.
तर भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानूसार आता जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यांच्या पहिल्या 15 दिवसात पाऊस गायब होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामाची वाट बिकट होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात कपासू पिकांवर मावा व तुडतुडे या किडीचा प्रार्दुभाव असून मका पिकावर लष्कारी अळीने हल्ला चढवला आहे. काही तालुक्यात तांबुसपणा देखील आढळून आला असून सोयाबीन पिकांवर चक्री भूंगा, उंट अळीचा प्रार्दुभाव दिसून येत आहे. यामुळे पिकांचे नुकसान होत असून आधीच पिकांच्या पाण्याच्या व्यवस्थापनात गुंतलेल्या बळीराज समोेरील अडचणी वाढतांना दिसत आहेत.
कपाशीची वाढ खुंटली
जिल्ह्यात यंदा कृषी विभागाने आवाहन केल्यानंतरही अनेक शेतकर्यांनी 1 जूनपूर्वीच कपाशाची लागवड केली. जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी 1 लाख 38 हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झालेली आहे. पावसाच्या खंडामुळे बागायत भागातील देखील कपाशीची वाढ खुंटली असून पिक सध्या अवघ्या 7 ते 8 पानावर दिसत असल्याचे निरिक्षण कृषी विभागाने नोंदवले आहे. यामुळे कपाशीवर मावा व तुडतुड्या किटकांचा प्रार्दुभाव वाढलेला दिसत आहे. यामुळे यंदा कपाशीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
संगमनेर, अकोलेत मकावर लष्करी अळीचा हल्ला
अकोले व संगमनेर तालुक्यात मका पिकावर लष्करी अळीचा प्रार्दुभाव असून ते नुकसान पातळीवरच्या वर गेलेले आहे. इतर तालुक्यात हा प्रार्दुभाव नुकसान पातळीच्या खाली असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. राहाता तालुक्यात अनेक ठिकाणी मका पिकांवर तांंबुसपणा दिसत आहे. यासह सोयाबीन पिकाचे क्षेत्र अधिक असणार्या तालुक्यात वेगवेगळ्या अळींनी पिकावर हल्ला चढवला आहे. यासह दक्षिण जिल्हा व पठार भागातील मुग व उडिद पिकाची वाढ पावसाअभावी खुंटली असून या ठिकाणी उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.





