Saturday, November 23, 2024
Homeनगरखरीप वाढीच्या अवस्थेत तर शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत

खरीप वाढीच्या अवस्थेत तर शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत

राहाता तालुक्यात 93 टक्के क्षेत्रावर पेरण्या

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. राहाता तालुक्यात 93 टक्के क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे. पावसा अभावी ही पिके येतील का? या चिंतेत शेतकरी आहेत. त्यामुळे शेतकरी जोरदार पावसाची चातकासारखी वाट पाहात आहेत. तालुक्यात खरीप हंगामाचे एकूण सरासरी 28,852 हेक्टर इतके आहे. यात सोयाबीनची 28604 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मका 5106 हेक्टर, कापूस 1852 हेक्टर, बाजरी 910 हेक्टर, भुईमूग 186 हेक्टर, कडधान्य 280 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. उसाचे क्षेत्र वगळता सर्वसाधारण खरी पक्षेत्रापैकी 93 टक्के क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे. खरीप पिक वाढीच्या अवस्थेत आहे तर शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे. पावसाचे प्रमाण आतापर्यंत सरासरीच्या 38 टक्के इतके आहे. पिके उगवून आली आहेत. मात्र पिकांना पावसाची तीव्र गरज आहे.

- Advertisement -

विहीरी तसेच इंधन विहीरींना या हंगामात अजुनही पाणी वाढलेले नाही. किंबहुना त्यांची पातळी वाढण्यासाठी पुरेसा पाऊस झालेला नाही. ज्या शेतकर्‍यांकडे संरक्षीत पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यांनी तुषार सिंचनाचा वापर करण्याची गरज आहे. आषाढ सरींचेही तालुक्यात समाधानकारक आगमन होत नाही. परिणामी दुपारच्या कडक उन्हात सुकून जातात. पावसाचे वातावरण तयार होते परंतु पाऊस मात्र पडत नाही. पावसाळ्याचा दिड महिना उलटत आला आहे. अजुनही ओढे, नाले, बंधारे भरलेले नाहीत. त्यामुळे खरीपाचीच नव्हे तर भविष्याच्या पिकांची काळजीही शेतकर्‍यांना सतावत आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची परिस्थिती आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना ही शासनाने मागील वर्षापासून एक रुपयामध्ये सुरु केलेली आहे. त्याची अर्ज करण्याची शेवटची मुदत 15 जुलै असून ज्या शेतकर्‍यांनी विमा भरलेला नसेल त्यांनी जवळच्या सेतू केंद्रामध्ये जावून विमा भरावा.

  • आबासाहेब भोरे, तालुका कृषी अधिकारी
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या