अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
दमदार सुरूवातीनंतर गायब झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील खरीप हंगाम अडचणीत आला आहे. यंदा जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यांत अवघा 16 दिवस पाऊस झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. यामुळे दोन महिन्यांत सरासरी 40 टक्क्यांंच्या जवळपास पावसाची तूट आहे. जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जूनमध्ये 8 व जुलै महिन्यांत 8 दिवसच मान्सून बरसला. आता ऑगस्टमधील पहिला आठवडा संपला असून पावसाने पाठ फिरवल्याने पिकांची परिस्थिती गंभीर होतांना दिसत आहे.
नगर जिल्हा हा पर्जन्यछायेत मोडत असल्याने मान्सूनमध्ये पडणार्या पावसाचे प्रमाण जिल्ह्यात कमी असते. मात्र, यंदा दर महिन्याला पडणार्या पावसाचे प्रमाण हे सरासरीपेक्षा कमी असल्याचे दिसत आहे. मान्सूनपूर्व पावसाच्या दमदार हजेरीनंतर यंदा पाऊस गायब झाल्याने जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांची स्थिती नाजूक होतांना आहे. पावसाअभावी अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून पिकांवर विविध रोगाचा प्रार्दुभाव होतांना दिसत आहे. जिल्ह्यात जून महिन्यांत पडणार्या पावसाची सरासरी ही 108 मि.मी. असतांना प्रत्यक्षात 74 मि. मी. पाऊस झालेला आहे.
तर जुलै महिन्यांत पावसाची सरासरी ही 97.5 असतांना असतांना प्रत्यक्षात अवघा 61 मि.मी. पाऊस झालेला आहे. दोन पावसात मोठा खंड पडल्याने जिल्ह्यात खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहे. दुसरीकडे गेल्या दोन दिवसापासून मुळा, भंडादरा, निळवंडे यासह दक्षिण जिल्ह्याला वरदान असणार्या पुणे जिल्ह्यातील धरण परिसारात पावसाने उघडीप घेतली आहे. यामुळे धरणातील पाणी साठा देखील रोडावला आहे. दरवर्षी 15 ऑगस्टला भंडारदरा धरण ओव्हरफ्लो होत असते. यंदा ते होणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
सध्या मुळा व भंडारदरा धरणात 90 टक्क्यांच्या पेक्षा अधिक पाणीसाठा ही जमेची बाजू आहे. जिल्ह्यात रक्षाबंधनानंतर पावसाला सुरूवात होणार असल्याचे हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात पावसाला पोषक वातावरण असतांना ही पाऊस होतांना दिसत नाही. यामुळे शेतकरी चिंतेत दिसत आहेत. जिल्ह्यात पावसात मोठा खंड पडल्याने खरीप हंगाम आणि त्यानंतर रब्बी हंगामाचे काय होणार असा प्रश्न आता शेतकर्यांसमोर दिसत आहे.
आतापर्यंतचा पाऊस
नगर 148.9 मि. मी. (31 टक्के), पारनेर 168.6 मि.मी. (40 टक्के), श्रीगोंदा 167.6 मि.मी. (41.6 टक्के), कर्जत 167.8 मि.मी. (40.9 टक्के), जामखेड 182.9 मि.मी. (29.1 टक्के), श्रीगोंदा 144.6 मि.मी. (31.2 टक्के), पाथर्डी 134.9 मि.मी. (28.5 टक्के), नेवासा 121.8 मि.मी. (28.3 टक्के), राहुरी 133.2 मि.मी. (30.8), संगमनेर 155.1 मि.मी. (44.2 टक्के), अकोले 255.9 मि.मी. (52.4 टक्के), कोपरगाव 134.9 मि.मी. (33.4 टक्के), श्रीरामपूर 104.9 मि.मी. (22.7 टक्के) आणि राहाता 145.4 मि.मी (32 टक्के) असा आहे.
आता मदार गणपती बाप्पांवर
दरवर्षी गणेशोत्सव काळात जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. यंदा देखील शेतकर्यांची मदार आता गणेशोत्सवावर राहणार आहे. या काळात पाऊस झाल्यास त्याचा फायदा रब्बी हंगामाला होणार आहे. हवामान खात्याने जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यांत पाऊस सरासरी ओलांडणार असल्याचे सांगितले आहे. तसे झाल्यास शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाणार आहे. अन्यथा यंदा शेती सिंचनाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.





