संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील धांदरफळ येथे महाशिवरात्री दिवशी रामेश्वर मंदिर परिसरात नगरच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करत बनावट व मुदतबाह्य खवा सदृश पदार्थ नष्ट केला आहे. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी, महाशिवरात्रीनिमित्ताने रामेश्वर मंदिर परिसरामध्ये भाविकांसाठी पेढा, मिल्क केक, बर्फी या नावाने प्रसाद विक्री सुरू असल्याचे आढळले. त्यासाठी वापरात येणारा बनावट व मुदतबाह्य खवासदृश पदार्थ गुजरातमधून आणून त्यापासून प्रसाद विक्री करत असल्याची बाब उघडकीस आली आहे.
त्यामुळे धांदरफळ येथील संदीप काळे यांचेकडून सुमारे चारशे किलो मुदतबाह्य खवासदृश पदार्थ जप्त करण्यात आला व नाशवंत व मुदतबाह्य असल्याने जेसीबीच्या माध्यमातून खड्डा खोदून त्यामध्ये नष्ट करण्यात आला. त्याची एकूण किंमत एक लाख 11 हजार रुपये आहे. सदरची कारवाई अन्न व औषध प्रशासन अहिल्यानगर येथील अन्नसुरक्षा अधिकारी राजेश बडे, प्रदीप पवार यांनी सहाय्यक आयुक्त सोपान इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. कारवाईमध्ये अन्न व औषध प्रशासनाचे नमुना सहाय्यक सागर शेवंते, शुभम भस्मे हे देखील सहभागी होते.