नवी दिल्ली | वृत्तसंस्था
महाराष्ट्राच्या युवा नेमबाजांनी खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 मध्ये आपल्या अचूक नेमबाजीने सुवर्णपदकांवर नाव कोरले. बिहार येथे आयोजित शूटिंग स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी वेदांत नितिन याने 50 मीटर थ्री पोजीशन्स राइफल (पुरुष युवा वर्ग) मध्ये 452.5 गुणांसह सुवर्णपदक पटकावले. त्याने हरियाणाच्या रोहित कन्यन (451.9) आणि पंजाबच्या अमितोज सिंह (440.1) यांना मागे टाकत अव्वल स्थान मिळवले.
दुसरीकडे, नवी दिल्लीतील डॉ. कर्णी सिंह शूटिंग रेंज येथे दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या 17 वर्षीय प्राची गायकवाड हिने 50 मीटर राइफल थ्री पोजीशन (युवा महिला वर्ग) मध्ये 458.4 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. प्राचीने स्थिरता आणि आत्मविश्वास दाखवत सर्वांचे लक्ष वेधले. मुंबईत अरुण वारेसी, बिबास्वान गांगुली आणि शुभम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या प्राचीला तिचे वडील शशिकांत गायकवाड यांच्या प्रोत्साहनामुळे नेमबाजीची आवड निर्माण झाली.